नाशिक : ‘नमामि गोदा’ त चार उपनद्यांचा समावेश

गोदावरी नदी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदावरीसह नंदिनी, वालदेवी, वाघाडी आणि कपिला या उपनद्यांचाही आता नमामि गोदा या महत्त्वाच्या प्रकल्पात समावेश करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या सहा महिन्यांत सल्लागार संस्थेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे.

गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी मनपातील तत्कालीन सत्ताधारी भाजपने ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मांडला होता. केंद्र शासनाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला असून, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरता सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया मनपा स्तरावर सुरू आहे. गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानुसार आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असून, नंदिनी, वालदेवी, वाघाडी, कपिला या गोदावरीच्या उपनद्यांची प्रदूषणातून सुटका व्हावी, यासाठी नमामि गोदा प्रकल्पात त्यांचा समावेश करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. उपनद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी तसेच कंपन्यांचे रासायनिक पाणी सोडले जात असल्याने उपनद्या प्रदूषित झाल्या आहेत. नदीपात्रांलगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणेदेखील झाली आहेत. या उपनद्या गोदावरी नदीला येऊन मिळतात. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्रही प्रदूषित होते. त्यामुळे गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीकडेही लक्ष दिले जाणार आहे.

सल्लागाराची लवकरच नियुक्ती

प्रकल्पाच्या सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रक्रिया अंतिम करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेसमोर प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. सल्लागार नियुक्तीनंतर पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर अहवाल राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाईल.

प्रकल्पात या बाबींचा समावेश

१) गोदावरी व उपनद्यांच्या काठच्या सुमारे १५० किमी लांबीच्या मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती करणे, क्षमतावाढ, सुधारणा, नाल्यांमध्ये व उपनद्यांमध्ये वाहणारे मलजल अडविणे आणि वळविणे: २२५ कोटी रुपये

२) मखमलाबाद, कामटवाडा येथे मलनिस्सारण केंद्र उभारणे: १९८ कोटी

३) नव्याने विकसित झालेल्या रहिवासी भागात मलवाहिका टाकणे: १०० कोटी

४) नदीकाठ सुशोभीकरण, घाट विकास, हेरिटेज डीपीआर समाविष्ट करणे: ८०० कोटी

५) प्रदूषित पाणी मलनिस्सारण केंद्रांच्या माध्यमातून पुनर्वापरासाठी लागणारी यंत्रणा उभारणे: ५०० कोटी

हेही वाचा :

The post नाशिक : 'नमामि गोदा' त चार उपनद्यांचा समावेश appeared first on पुढारी.