Site icon

नाशिक : नवीन बिटको रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी फेरनिविदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालय तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी आरोग्य वैद्यकीय विभागाने फेरनिविदा राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालय स्वच्छतेचा एक वर्षाचा ठेका दिला जाणार असून, त्यासाठी दोन कोटींचा खर्च होणार आहे.

महापालिकेकडे आजमितीस सुमारे 1,700 सफाई कर्मचारी आहेत. त्यांना संपूर्ण शहरासह महापालिकेच्या मुख्यालयासह इतर इमारती, शहरी आरोग्य केंद्र या आस्थापनांची स्वच्छतेची कामे करावी लागतात. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने मनपाने 700 कंत्राटी कामगारांची खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून भरती केली. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेला हातभार लागत आहे. महापालिकेच्या नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयाच्या पाचमजली इमारतीची देखभाल, दुरुस्ती योग्य प्रकारे व्हावी, याकरिता ठेकेदाराच्या माध्यमातूनच या रुग्णालयाची स्वच्छता करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्या कार्यकाळात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात 11 ठेकेदार संस्थांनी निविदा दाखल केल्या. मात्र, त्यातील 10 संस्थांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांना मुदत देण्यात आली होती. दरम्यान, रमेश पवार यांची तडकाफडकी बदली झाल्याने नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कागदपत्रांसाठी ठेकेदारांना मुदत न देता फेरनिविदा काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, कागदपत्रे जमा न करणार्‍या संस्थांऐवजी सर्व अटी-शर्ती तसेच कागदपत्रांची पूर्तता करणार्‍यांचाच विचार करण्याचे आदेश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

दिवसातून तीन वेळा सफाई :
रुग्णालयाची दिवसातून सकाळ, दुपार आणि सायंकाळी अशी तीन वेळा स्वच्छता करण्याबरोबरच रुग्णांची बेडशीट बदलणे, शौचालये, वीज उपकरणांची स्वच्छता तसेच रुग्णास सहाय करण्याचे कामही ठेकेदाराने पाहायचे आहे. रुग्णांचे आरोग्य अधिक लवकर चांगले व्हावे, यासाठी रुग्णालयातील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. त्यादृष्टीनेच स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नवीन बिटको रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी फेरनिविदा appeared first on पुढारी.

Exit mobile version