नाशिक : नवीन वर्षात मनपा शाळा होणार ‘स्मार्ट’

स्मार्ट स्कूल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील महापालिकेच्या 112 पैकी 69 शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 70 कोटींच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या शाळा ‘स्मार्ट’ होणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी स्मार्ट स्कूल प्रकल्पाबाबत पंचक भागातील मनपा शाळा क्रमांक 49 मध्ये आढावा बैठक घेतली होती. स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत मनपाच्या एकूण 69 शाळा स्मार्ट स्कूल होणार आहेत. एकूण 656 स्मार्ट क्लास, 69 संगणक प्रयोगशाळा, 69 मुख्याध्यापक कक्ष असणार आहेत. त्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गंत 70 कोटी 30 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या बेनेट कोलमेन अ‍ॅण्ड कंपनीला पुढील आठवड्यात कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. तर जानेवारीपासून स्मार्ट स्कूलच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती स्मार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार मनपा शाळा स्मार्ट करण्याबरोबर तेथील स्वच्छतागृहे, कंपाऊंड, खेळ सामुग्री, डिजिटल साहित्य या मुद्द्यांकडेही लक्ष दिले जाणार आहे. पुढीलवर्षी जूनमध्ये शाळा उघडताना विद्यार्थ्यांना स्मार्ट शाळेचे दर्शन घडेल, असा दावा मोरे यांनी केला आहे.

शिक्षकांना प्रशिक्षण :
क्षमताधिष्ठित आणि अत्याधुनिक अध्यापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान प्रणाली, डिजिटल आणि मल्टिमीडिया सामग्री, सर्वांगिण विद्यार्थी विकास, भौतिक सुविधा या सर्व घटकांचा विचार स्मार्ट स्कूल प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, वॉश सुविधा, शिक्षकांची क्षमतावाढ, जीवन कौशल्य प्रशिक्षणाचा समावेश आहे. शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल.

जानेवारीपासून स्मार्ट स्कूल प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना स्मार्ट स्कूलमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. -सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी.

हेही वाचा:

The post नाशिक : नवीन वर्षात मनपा शाळा होणार ‘स्मार्ट’ appeared first on पुढारी.