नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यात रविवारी (दि.९) वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात आवकाळी पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नांदगाव : अवकाळीमुळे कांदयाचे झालेले नुकसान.

तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण, ढेकुण, कुसुम तेल, गोंडेगाव जवळीक इत्यादी ठिकाणी तसेच कन्नड तालुक्यातील जेऊर, मुंगसापूर, तांदूळवाडी, आडनव आणि परिसरात सायंकाळी अचानक बेमोसमी पावसासह, बोराच्या आकाराच्या गारांचा पाऊस आणि वादळ आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे जातेगांव येथील श्रीराम मंदिर जवळील शेवरीचे झाड उन्मळून विजेच्या तारेवर पडल्याने विजेचे तीन खांब मोडले आहे. सुदैवाने वीजपुरवठा बंद असल्याने जिवीत हानी टळली. जातेगांव येथील रहिवासी व सध्या सैन्यदलात कार्यरत असलेले शशिकांत खैरनार, आणि त्यांचे बंधू गणेश खैरनार त्यांच्या राहत्या घराचे १२ पत्रे उडाले असून त्यांच्या शेतातील साठवून ठेवलेला सुमारे दहा क्विंटल कापूस आणि धान्याचे नुकसान झाले असून यामध्ये अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जातेगांव येथील सहारा कृषी सेवा केंद्राचे संचालक गुलाब चव्हाण यांनी दादासाहेब भावराव सोनवणे यांच्या शेतातील मध्ये साठवून ठेवलेला ३०० क्विंटल वादळामुळे शेड उडाल्याने कांद्याचे अंदाजीत नुकसान ४ लाख रुपये नुकसान झाले आहे. तर शेडचे ६ ते ७ लाख रुपये नुकसान असे त्यांचे ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर कोकिळाबाई अशोक पाटील या महिला शेतकरी भगिनीचे शेतातील शेडनेट वादळामुळे उडाल्याने अंदाजे दहा लाख रुपयांचे आणि त्यातील लागवड केलेला शिमला मिरची या पिकाचे नुकसान झाले. शेतकरी बांधवांनी काढून ठेवलेला उन्हाळ कांदा, मका, लाल कांदा, कांद्याचे बियाणे, गहु पिकांचे त्याचप्रमाणे रामफळ, आंबा, चिकू, केळी इत्यादी फळबाग पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत तसेच काढणीस आलेला कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वारंवार होणाऱ्या असमानी संकटामुळे शेती पिकाला भाव नसल्याने शेतकरी बांधव अडचणीत सापडलेला असून आता पूर्णतः हतबल झाला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती मिळाली आहे. तसेच संपूर्ण घाटमाथ्यावरील वीज पुरवठा खंडित झालेला असून सोमवारी (दि.10) सकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

नांदगाव : बोरीच्या आकाराच्या गारा पडल्याने शेतपिकातील रोपांनी माना टाकल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : नांदगावी अवकाळीचे थैमान; घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान appeared first on पुढारी.