नाशिक : नाकर्त्या कारभाराबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी – पालवेंची उद्धव ठाकरेंवर टीका

भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात कोरोनाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. ठाकरे सरकारच्या कारभाराला कंटाळून अनेक उद्योग राज्याबाहेर गेले. शासनाच्या अनागोंदीमुळे महाराष्ट्र रसातळाला गेला. त्यामुळे भ्रष्ट कारभाराबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी. अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सोमवारी (दि. 24) प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली.

पालवे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे आपल्या नाकर्त्या कारभाराबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. स्वतःवर स्तुतिसुमने उधळण्याच्या या आत्मकेंद्री स्वभावामुळे आज ठाकरे यांनी पक्ष, चिन्ह, निष्ठावंत कार्यकर्ते गमावल्याचा आरोप त्यांनी केला. पाचोरा (जि. जळगाव) येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी भाषणाची जुनी टेप वाजवली, अशा शब्दांत सभेची खिल्ली उडवली. जगातील सर्वांत मोठा पक्ष आणि देशातील सर्वाधिक जनाधार असलेल्या भाजपला पोकळ आव्हाने देण्याआधी ठाकरे यांनी मागे वळून आपल्या पाठीशी काय उरले आहे, हे तपासावे. आता पक्ष आणि चिन्ह गमावल्यावर पाकिस्तानकडून मान्यता घेण्यापर्यंत लाचारीची मजल गेलेली पाहून बाळासाहेबांना काय वाटले असेल, असा सवालही पालवे यांनी केला.

स्वत:च्या नावावर समोर या
आपले नाव बाळासाहेबांशी जोडले नसते, तर मला काडीची किंमत नाही, असे उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात. हिंमत असेल, तर स्वतःचे नाव वापरून जनतेसमोर या, असे आव्हानही पालवे यांनी ठाकरे यांना दिले.

हेही वाचा:

The post नाशिक : नाकर्त्या कारभाराबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी - पालवेंची उद्धव ठाकरेंवर टीका appeared first on पुढारी.