नाशिक : ‘नाफेड’कडून 2 जूनपासून कांदा खरेदीचे संकेत

मालेगाव www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : सुरेश बच्छाव
तालुक्यासह राज्यभरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून असलेली ‘नाफेड’ची (नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) कांदा खरेदी येत्या शुक्रवार (दि. 2) पासून सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. नाफेडच्या रिक्त झालेल्या व्यवस्थापकीय संचालकपदी रितेश चौहान यांनी पदभार स्वीकारला असून त्यानंतर त्यांनी तत्काळ कांदा खरेदीसाठीची पावले उचलली आहेत. त्यानुसार तालुक्यातील फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या गोडाउन तपासणीची कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे.

गतवर्षी एप्रिलमध्ये सुरू झालेली नाफेडची कांदा खरेदी यंदाच्या वर्षी अद्यापही सुरू झालेली नाही. दुसरीकडे कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडल्याने लवकरात लवकर खरेदी सुरू होण्याची जोरदार मागणी होत होती. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून कांदा खरेदी सुरू होण्याबाबतच्या वल्गना फोल ठरत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला होता. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीही व्यक्त होत होती. सद्यस्थितीत बाजार समितीत कांद्याला अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. त्यातून उत्पादनखर्चही वसूल होत नसल्याने नाफेडची खरेदी सुरू झाल्यास बाजारभाव सुधारण्याची अपेक्षा असल्याने लवकरात लवकर नाफेडची कांदा खरेदी सुरू व्हावी, अशी मागणी होत होती. परंतु, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक राजबीरसिंग हे सेवानिवृत्त झाल्याने तसेच अन्य कारणांमुळे खरेदीला मुहूर्त लागत नव्हता.

अखेर नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी चौहान यांची नियुक्ती झाली आहे. नाफेडचे अध्यक्ष डॉ. बिजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत चौहान यांनी राजबीरसिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला. विशेष बाब म्हणजे तरुण असलेल्या चौहान यांनी पदभार स्वीकारताच कांदा खरेदीसाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना कांदा खरेदीसाठीचे उद्दिष्ट ठरवून देत परवानगी देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यासाठी कंपन्यांच्या गोडाऊन तपासणी व जिओ टॅगिंगची कार्यवाहीदेखील सुरू झाली असून शनिवारी (दि. 27) तालुक्यात ही कार्यवाही करण्यात आली आहे. शुक्रवार (दि. 2) पासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू होण्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यामुळे शेतकर्‍यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

‘नाफेड’चे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक आयएएस रितेश चौहान यांनी पदभार स्वीकारताच तातडीने कांदा खरेदीचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्रातील आणि विशेषत्वाने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. चौहान यांनी सुरुवातीपासूनच धडाकेबाज कामकाजाची प्रचिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात नाफेडकडून शेतकरीहिताचे अधिकाधिक निर्णय होऊन अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे. – सुरेश पवार, अध्यक्ष, महाराज्य ग्रुप ऑफ फार्मर प्रोडू्यसर, महाराष्ट्र.

‘महाराज्य’ला 14 हजार मे. टनची परवानगी
नाफेडने महाराष्ट्रातील 14 फेडरेशनला कांदा खरेदीसाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी महाराज्य ग्रुप ऑफ फॉर्मर प्रोड्यूसर या फेडरेशनला 14 हजार मेट्रिक टन कांदाखरेदीसाठी परवानगी मिळाली आहे. फेडरेशन अंतर्गत येणार्‍या 15 फार्मर प्रोड्यूसर कंपन्या पाच जिल्ह्यांतून कांदा खरेदी करणार असून त्यात नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘नाफेड’कडून 2 जूनपासून कांदा खरेदीचे संकेत appeared first on पुढारी.