नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌

द्राक्ष थंडी www.pudhari.news

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा
गुलाबी थंडीचा अनुभव चालु हंगामात निफाड तालुक्यात एक महिना अगोदरच येऊ लागला आहे. रविवार, दि. २० रोजी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर पारा ७.४ अंशावर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या द्राक्षबागांना मात्र वाढलेल्या थंडिने चांगलीच हुडहुडी‌ भरली आहे.

थंडीत वाढ झाल्याने गहु, हरभरा या रब्बी पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. चालु द्राक्ष हंगामात फळबहार छाटण्या अती पाऊसामुळे एक महिना लांबल्यामुळे द्राक्षमाल तयार होण्यास विलंब असला तरी सध्याच्या वातावरणामुळे द्राक्षवेलीच्या मुळ्या व पेशींचे कार्य मंदावत आहे. त्याचा परिणाम पुरेसा अन्नपुरवठा द्राक्षवेलीतून फळापर्यंत जात नाही. द्राक्ष वेल व फळाच्या वाढ विकासाला थंड तपमानाचा फटका बसणार आहे. शिवाय तपमान घसरत चालले असल्याने द्राक्षबागांत मुळी व पेशी कार्यरत राहण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. परंतु ऎन थंडीत भारनियमनात एक तास वाढ झाल्याने द्राक्ष बागायतदारांची अवस्था आगीतुन फोफाट्यात अशी होत आहे.

द्राक्ष हंगाम उशिराने असला तरी घसरणारे तापमान हे द्राक्ष वेलीला व फळाला मारक आहे. द्राक्षमालाच्या विकासाला या थंडीमुळे ब्रेक बसणार आहे. शिवाय उशीराने गत पंधरवाड्यात झालेल्या फळबहार छाटण्यांनंतरच्या फुटींची वाढ खुंटणार आहे. अशा अवस्थेत पाणीपुरवठा करणे हा पर्याय आहे. त्यासाठी थंडीच्या हंगामात शासनाने द्राक्ष उत्पादक भागाचा विचार करु‌न नाशिक विभागात पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपावेतो अखंडीत वीजपुरवठा केला पाहिजे तर, शेतकरी उभारीने शेती करु शकणार आहे. – कैलासराव भोसले, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे.

हेही वाचा:

The post नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌ appeared first on पुढारी.