नाशिक : निमगाव-देवपूरला बंधार्‍याचा भराव गेला वाहून

निमगाव देवपूर www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात परतीच्या पावसाने देवनदीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आल्याचे चित्र असून त्यातच मंगळवारी (दि.18) निमगाव देवपूर परिसरात नुकतेच काम पूर्ण झालेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍याचा भराव वाहून गेला. पाटबंधारेच्या स्थानिक स्तर विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

देवनदीवर साखळी पद्धतीचे पाच बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यापैकी निमगाव देवपूरचा हा एक बंधारा शनि मंदिराजवळ असून मे-जून महिन्यात काम जवळपास पूर्ण करण्यात आले. वॉटर कुशनचे काम बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या आग्रही मागणीमुळे बंधार्‍यात पाणीसाठा रहावा यासाठी दोन दिवसांपूर्वीच बंधार्‍याचे नीडल्स टाकण्यात आले. मात्र देवनदीला आलेल्या पुरात भराव वाहून गेल्याने बंधार्‍यातील पाणी नदीपात्रातून वाहून जात आहे. पाण्याचा दाब वाढल्यानंतर नीडल्स काढण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, असे समजते. आता भराव दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

बंधार्‍याची क्षमता 20 दलघफू…
या बंधार्‍याच्या कामावर सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणी साठविण्यात आले. मात्र अशातच बंधार्‍याचा भराव वाहून गेल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभाग 15 सप्टेंबरपर्यंत बंधार्‍याचे निडल टाकतात मात्र, यावेळी महिनाभर उशिरा निडल टाकूनही मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : निमगाव-देवपूरला बंधार्‍याचा भराव गेला वाहून appeared first on पुढारी.