नाशिक : निलगिरीचे झाड मुळापासून तोडल्याने ४५ हजाराचा दंड

अवैध वृक्षतोड,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील सप्तरंग स्टॉपजवळील शाहू चौकात शुक्रवारी (दि. २५) पहाटेच्या सुमारास जागामालक जगदीश सोनार यांनी निलगिरी प्रजातीचे झाड मुळापासून तोडून टाकल्याची घटना उघडकीस आली होती. या अवैध वृक्षतोड प्रकरणाची धनराज रणदिवे या सामाजिक कार्यकर्त्याने पालिकेच्या ई कनेक्ट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. या ऑनलाइन तक्रारीची दखल घेत पालिकेच्या पंचवटी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. त्यानंतर जागा मालकाला पालिकेने नोटीस बजावत वृक्षतोडीबाबत खुलासा मागवला होता. संबंधित जागा मालकाने वृक्ष छाटणी किंवा तोडणीबाबत कोणतीही परवानगी मागितली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जागा मालक जगदीश सोनार यांना ४५ हजार रूपयांचा दंड आकारला असून, सोनार यांनी मंगळवारी (दि. १३) रोख स्वरूपात दंडाचा भरणा केला.

दरम्यान, आजही पंंचवटी परिसरातील अनेक भागांत सर्रासपणे अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. काही अर्जदार वृक्षांच्या फांद्या छाटण्याच्या किंवा वाळलेले वृक्ष दाखवून ते तोडण्याची परवानगी मिळवतात आणि मिळालेल्या परवानगी व्यतिरिक्तदेखील विनापरवानगी वृक्षतोड करत असल्याचे समोर येत आहे. परवानगी दिल्यानंतर वृक्ष छाटणी किंवा तोडणीच्या वेळी उद्यान विभागाचे अधिकारी वा कर्मचारी कोणीही उपस्थित राहत नाही. तसेच त्या ठिकाणी पाहणीदेखील केली जात नसल्याने हे प्रकार वाढले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : निलगिरीचे झाड मुळापासून तोडल्याने ४५ हजाराचा दंड appeared first on पुढारी.