नाशिक : निवृत्त एसटीचालकाची विवाहित लेक झाली आरटीओ इन्स्पेक्टर

निवृत्त एसटी चालकाची लेक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन मुलांच्या मातेने स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन करीत प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) सहायक निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. कविता पवार-सूर्यवंशी असे या महिलेचे नाव असून, विवाहाच्या सात वर्षांनंतरही त्यांनी मिळविलेले हे यश महिलावर्गासाठी एक धडाच आहे. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठणे कठीण नसते, असा संदेशच जणू त्यांनी सर्वांनाच दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत हे कविता पवार-सूर्यवंशी यांचे माहेर. वडील गुलाब पवार हे राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले बसचालक आहेत. कविता यांनी चांदवड महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

2015 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सचिन सूर्यवंशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना पाचवर्षीय एक आणि नऊ महिन्याचा अशी दोन मुले आहेत. विवाहानंतरही त्यांनी उच्च शिक्षणाचा फायदा घेण्याचे ठरवत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. यासाठी हॉटेल व्यावसायिक असलेले त्यांचे उच्चशिक्षित पती आणि राजूर येथे मुख्याध्यापक असलेले सासरे यांनीही त्यांना पाठबळ दिले. राज्य लोकसेवा आयोगातर्फे 2019 मध्ये आलेल्या जाहिरातीनुसार 2021 मध्ये त्यांनी पूर्व परीक्षा दिली. त्यात पात्र ठरल्यानंतर त्यांनी मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये त्यांनी यश मिळविले आहे. त्यांना प्रादेशिक परिवहन विभागात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदावर नियुक्ती मिळणार आहे. अभ्यासाबाबत अनेक कारणे सांगणार्‍या युवक आणि युवतींसह विवाहित महिलांच्या डोळ्यांत कविता यांनी अंजन घातले आहे. या यशाबद्दल पिंपळगाव बसवंत येथील साई मित्र परिवार, वाघ मित्र परिवार, क्रांती मित्र परिवाराच्या वतीने कविता यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद पाटील, संतोष वाघ, आप्पा जाधव, प्रशांत नार्वेकर, बाळू गायकवाड, नितीन वाघ, महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

कुठलेही ध्येय निश्चित असेल आणि त्या मार्गावर जिद्दीने प्रवास सुरू ठेवला तर यश गाठणे अवघड नाही. त्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यासाठी कुटुंबाचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे, जो मला मिळाला. शासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न होते. यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. विवाहानंतरही अभ्यासात सातत्य ठेवत दुसर्‍या प्रयत्नात मला यश मिळाले.
– कविता पवार-सूर्यवंशी

हेही वाचा :

The post नाशिक : निवृत्त एसटीचालकाची विवाहित लेक झाली आरटीओ इन्स्पेक्टर appeared first on पुढारी.