नाशिक : निष्ठावंतांनाच उमेदवारी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांची बैठक

www.pudhari.news

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेसाठी सध्याचा काळ आव्हानात्मक असून, निष्ठावान शिवसैनिकांसाठीही हा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत निष्ठावानांनाच उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. प्रत्येक प्रभाग, गट गणातील तीन शिवसैनिकांची नावे पक्षाला कळवले जाणार असून त्यातूनच उमेदवारांची निवड पक्ष पातळीवर करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाजे यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील शिवसैनिकांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेची निष्ठावान असणार्‍यांनाच या पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याच्या सर्व नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणीही टिकीट मागितले आणि लगेच त्याला टिकीट मिळाले असे यापुढे होणार नाही. शिवसेनेसोबत असलेली निष्ठा, जनमानसातील प्रतिमा या बाबींचा विचार करून पक्ष पातळीवर उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. त्यांचे हे कामच त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे वाजे यांनी नमूद केले. आपण शेवटच्या क्षणी मॅनेज होऊ अशा पद्धतीने आपल्याबद्दल अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र, आपल्याला मॅनेज करणारा अजून जन्माला आला नसल्याचे सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे म्हणाले. आपण राजाभाऊंसोबत असून शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहोत. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शहरप्रमुख गौरव घरटे, नारायण वाजे, अरुण वारुंगसे, नामदेव शिंदे, प्रकाश कदम, विठ्ठल राजेभोसले, कचरू खैरनार, विनायक शेळके, आनंदा शेळके, संग्राम कातकाडे, संजय सानप, सोमनाथ तुपे, अरुण वाघ, डॉ. रवींद्र पवार, रमेश पांगारकर, गोपाळ शेळके आदी उपस्थित होते.

राजाभाऊंना सर्वाधिकार द्या : सांगळे
राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेनेची दमदार बांधणी झाली असून तालुक्यातील उमेदवार ठरवण्याचे अधिकार त्यांना द्यावेत, अशी मागणी उदय सांगळे यांनी केली.

हेही वाचा:

The post नाशिक : निष्ठावंतांनाच उमेदवारी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांची बैठक appeared first on पुढारी.