नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी (दि.13) पहाटे शहरात दाखल झालेल्या दादा भुसे यांनी सकाळी तालुक्याचा पाहणी दौरा करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनस्तरावर सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी महसूल अधिकार्‍यांना दिल्या.

काटवन भागातील पोहाणे व कजवाडे गावाला मंत्री भुसे यांनी भेट दिली. यावेळी माजी उपमहापौर नीलेश आहेर, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अली इनामदार उपस्थित होते. शेतकर्‍यांना ‘एनडीआर’च्या नियमाप्रमाणे कोरडवाहू शेतीला 6 हजार 800 रुपये नुकसान भरपाई देण्यात येत होती. परंतु आता भरपाई दुपटीने म्हणजे 13 हजार 600 रुपये दराने मिळणार आहे. या अनुषंगाने शेतकरीहिताचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच येणार्‍या काळामध्ये शेतकर्‍यांच्या हिताचे गोर-गरीब, कष्टकरी, मजूर व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. कजवाडे परिसरात दोन ते तीन दिवसांमध्ये सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. अशा पिकांचेही तत्काळ पंचमाने करावेत. वीज, पाणी आदी समस्याही लवकरच सोडविल्या जातील, असेही
त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे appeared first on पुढारी.