नाशिक : नॅशनल गेम्ससाठी आदिवासी खेळाडूला डावलले, खो-खो असोसिएशनचा आरोप

खो खो खेळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येत्या २९ सप्टेंबरपासून अहमदाबाद येथे नॅशनल गेम्स स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी ७ ऑगस्टला पुणे येथे राज्य खो-खो संघाची निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकची आदिवासी खेळाडू वृषाली भोये ही सहभागी झाली होती. राष्ट्रीय व राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा गाजविणाऱ्या वृषालीला राज्याच्या संघात स्थान देण्यात आले नाही. हेही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रकातून समजले. राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील खेळाडूंना झुकते माप देत वृषालीला डावलण्यात आल्याचा आरोप जिल्हा खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस उमेश आटवणे यांनी केला.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंदार देशमुख उपस्थित होते. महिनाभरापूर्वी निवड चाचणी झाली असून, अद्यापही राज्याचा संघ जाहीर करण्यात आलेला नाही. नॅशनल गेम्ससाठी अवघे काही दिवस उरलेले असतानाही संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे गुलदस्त्यातच आहे. संघ निवडताना कोणते निकष लावण्यात आले हे राज्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले नाही. महिनाभर निवड झालेल्या खेळाडूंचे नावे का लपविली, असा सवाल आटवणे यांनी उपस्थित केला.

राज्य संघटनेकडून नेहमीच नाशिकबाबत दुजाभाव केला जात आहे. परिणामी, खेळाडूंना विविध स्पर्धांना मुकावे लागते. राज्य संघटनेचे सरचिटणीसांकडून नाशिकवर सातत्याने अन्याय करण्यात येत आहे. आदिवासी खेळाडूला डावलल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह नवीन क्रीडा आयुक्त आणि ऑलिम्पिक महासंघाकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच सदोष निवड चाचणीच्या चौकशीसाठी उच्चाधिकार समिती नेमण्याची मागणी केल्याचे आटवणे यांनी सांगितले.

खेळाडूंनी न्यायालयात जायचे का?

राज्य खो-खो संघटनेकडून नाशिकच्या खेळाडूंवर सातत्याने अन्याय केला जात आहे. जिल्हा संघटनांना विश्वासात न घेताच कामकाज सुरू असलेल्या कामकाजामुळे खेळाडूंसह पदाधिकारी हैराण झाले आहेत. वर्षभर मेहनत घेऊनही राज्य संघात स्थान मिळत नाही. कामगिरीच्या आधारे निवड झाल्यास खेळाडूंनी न्यायालयात जायचे का? असा प्रश्न मंदार देशमुख यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

The post नाशिक : नॅशनल गेम्ससाठी आदिवासी खेळाडूला डावलले, खो-खो असोसिएशनचा आरोप appeared first on पुढारी.