नाशिक : पंचायत समितीत ग्रामपंचायतीच्या 11, आरोग्य विभागातील 7 कर्मचार्‍यांच्या बदल्या

पंचायत समिती www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर पंचायत समितीत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.29) ऑफलाइन तालुकाअंतर्गत बदली प्रक्रिया पार पडली. यात ग्रामपंचायत विभागाचे 11, तर आरोग्य विभागाच्या 7 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता ही ऑफलाइन बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबवण्यात आली. ग्रामपंचायत विभागात 3 ग्रामविकास अधिकारी आणि आठ ग्रामसेवक बदली प्रक्रियेस पात्र होते. दातली येथील ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांची बारागावपिंप्री येथे, तर ठाणगावचे ग्रामविकास अधिकारी दीपक भोसले यांची शिवडा येथे प्रशासकीय बदली करण्यात आली. पांगरीचे ग्रामविकास अधिकारी पी. आर. बोरसे यांची दातली येथे विनंती बदली करण्यात आली. 6 ग्रामसेवकांची प्रशासकीय, तर 2 जणांची विनंती बदली करण्यात आली. आरोग्य विभागात एका औषधनिर्माण अधिकार्‍याची प्रशासकीय बदली करण्यात आली. दोन आरोग्यसेवकांची प्रशासकीय, एकाची विनंती, दोन आरोग्यसेविकांची प्रशासकीय आणि एका आरोग्य सहायकाची प्रशासकीय बदली करण्यात आली. प्रभारी गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सहायक प्रशासन अधिकारी एल. डी. जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर. बी. शेवाळे यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली.

दहा टक्के प्रशासकीय, पाच टक्के विनंती बदल्या
स्क्रीनवर पात्र कर्मचार्‍यांना रिक्त जागा दाखविण्यात आल्या. त्यावर पर्याय निवडून कर्मचार्‍यांनी सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतली. एकाच जागी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेले कर्मचारी प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरले. तर 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा केलेले कर्मचारी विनंती बदलीस पात्र होते. एकूण कार्यरत पदाच्या 10 टक्के बदल्या या प्रशासकीय पद्धतीने तर 5 टक्के विनंती बदल्या करण्यात आल्या.

132 शिक्षकांच्या तालुकाअंतर्गत बदल्या
शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या. त्यात 132 शिक्षक तालुका अंतर्गत बदलीसाठी पात्र होते. तर बाहेरच्या तालुक्यांमधून 43 शिक्षक सिन्नर तालुक्यात दाखल झाले. दरम्यान, 14 मे रोजी शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले. 30 मे पर्यंत शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : पंचायत समितीत ग्रामपंचायतीच्या 11, आरोग्य विभागातील 7 कर्मचार्‍यांच्या बदल्या appeared first on पुढारी.