नाशिक : पंधरा दिवसांत थकीत करासह शास्ती न भरल्यास बजावणार मालमत्ता जप्तीचे वॉरंट

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मार्चअखेर मालमत्ताकर थकबाकी वसूल व्हावी, यादृष्टीने मनपाच्या कर आकारणी विभागाने शहरातील ७६ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस बजावल्यामुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, पैकी साडेसात हजार मिळकतधारकांनी २० कोटी ६८ हजार रुपयांचा कर मनपाच्या तिजोरीत जमा केला आहे. येत्या १५ दिवसांत थकबाकी न भरल्यास संबंधितांच्या मालमत्ता जप्त करण्याचे वॉरंट बजावले जाणार आहे.

चालू आर्थिक वर्षात मालमत्ताकर वसुलीचे प्रमाण चांगले असले तरी एकूणच घरपट्टी थकबाकीचे प्रमाण ३५९ कोटींपर्यंत पाेहोचले आहे. या थकबाकीमध्ये दोन टक्के शास्तीप्रमाणे १४० कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील थकबाकी वसुलीकरता मनपाकडून प्रयत्न चालू आहेत. त्याकरता सूचनापत्र बजावणे, जप्तीच्या नोटिसा तसेच मालमत्ता लिलाव प्रक्रिया, मालमत्तांवर बोजा चढविणे, अशा प्रकारची कार्यवाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून केली जात आहे. त्यानुसार मनपाने ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना करवसुलीसंदर्भात नोटिसा बजावल्या असून, त्यापैकी ३ जानेवारीपर्यंत ४,५३८ थकबाकीदारांनी पूर्णपणे थकबाकी भरली असून, २,८९९ मिळकतधारकांनी अंशत: थकबाकी मनपाकडे जमा केली आहे. सूचनापत्र बजावल्यानंतर संबंधित थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, थकबाकी भरण्याकरता संबंधितांकडून मनपाशी संपर्क साधला जात आहे. थकबाकीदारांना थकबाकी जमा करण्यासाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच कर विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्तीचे वाॅरंट बजावले जाणार आहे.

कोरोना महामारीमुळे मनपाच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: पाणीपट्टी, घरपट्टी भरण्याकडे नागरिकांनी जवळपास दोन ते अडीच वर्षे पाठ फिरवल्याने कर थकबाकीचा आकडा वाढला आहे. उत्पन्न कमी झाल्यामुळे नोव्हेंबरअखेरपर्यंत तब्बल ४०० कोटींची तूट निर्माण झाली आहे. शहरात चार लाख ६६ हजार मिळकती आहेत. चालू आर्थिक वर्षात मालमत्ताकर वसुलीचे १५४ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २७ डिसेंबर २०२२ पर्यंत १२४ कोटी ७३ लाखांची वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण चांगले असले तरी थकबाकीचा आकडा मात्र वाढत आहे. त्याच अनुषंगाने मनपा कर विभागाने ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत.

.. तर मालमत्तांची लिलाव प्रक्रिया

७५ हजार ९६२ थकबाकीदारांकडे १४० कोटी रुपयांची नुसती शास्तीचीच रक्कम थकीत आहे. यामुळे आता संबंधितांकडून कराची थकबाकी वसूल करणार की, शास्तीची रक्कम वसूल करणार असा प्रश्न मनपासमोर आहे. सूचनापत्रवजा नोटीस बजावूनही थकबाकीदारांनी मालमत्ताकर न भरल्यास पुढील टप्प्यात जप्तीचे वॉरंट बजावून मालमत्ता जप्त केल्या जातील आणि त्यानंतर त्यांचे लिलाव करण्याची तयारी कर आकारणी विभागाकडून सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पंधरा दिवसांत थकीत करासह शास्ती न भरल्यास बजावणार मालमत्ता जप्तीचे वॉरंट appeared first on पुढारी.