नाशिक : पत्नीवर धारधार शस्त्राने वार करणाऱ्या उद्योजक पतीचाच मृत्यू

नाशिक

सिडको (नाशिक); पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून पतीने त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सिडकोतील संभाजी स्टेडियम समोरील एका बंगल्यात घडली. दरम्यान सदर घटनेनंतर पतीला चक्कर आल्याने ते खाली पडले त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी उद्योजक मयत आशिष कौशिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष कौशिक (वय ५८,रा.,संभाजी स्टेडियम समोर अश्विन नगर, सिडको ) यांनी (दि. १६) सकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास घरातील बेडरूम मध्ये त्यांची पत्नी ज्योती आशिष कौशिक ( ५४) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर बेडरूमच्या बाहेर जात आशिष यांनी त्यांचा मुलगा देव आशिष कौशिक याच्यावरही शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, देव आईच्या खोलीत पळाल्याने तो बचावला. दरम्यान बेडरूम मध्ये गेल्यावर देवने त्याची आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघताच त्याने त्याच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती देत मदतीसाठी बोलावले. त्यांचे नातेवाईक घरी आल्यानंतर देवने बेडरूमच्या बाहेर येऊन बघितले असता आशिष हे जमिनीवर पडलेले दिसून आले. दरम्यान आशिष व ज्योती यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आशिष यांना तपासून मयत घोषित केले.

दरम्यान आशिष यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी. वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की, पोलिस उप निरीक्षक किरण शेवाळे घटना स्थळी दाखल झाले. या बाबत देव आशिष कौशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी मयत आशिष कौशिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मयत उद्योजक आशिष कौशिक यांचे अंबड औद्योगिक वसाहत व गोदे वसाहत येथे कंपनी आहे.

याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण शेवाळे, उपनिरीक्षक उत्तम सोनावणे करत आहेत.

अधिक वाचा :

The post नाशिक : पत्नीवर धारधार शस्त्राने वार करणाऱ्या उद्योजक पतीचाच मृत्यू appeared first on पुढारी.