नाशिक : पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (पीएम स्वनिधी) योजनेसाठी नाशिक मनपाला १७,८४० चे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यादृष्टीने पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्यात नाशिक महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक शहरात २२,०८६ (१२४ टक्के) पथविक्रेत्यांना आतापर्यंत कर्जाचे वितरण झाले आहे. नाशिकने कोल्हापूर महापालिकेला मागे टाकले आहे.

कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीचा मोठा परिणाम राज्यातील शहरांमधील फेरीवाले व पथविक्रेत्यांवर झाला होता. त्यांना व्यवसाय परत सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने १ जून २०२० रोजी पीएम स्वनिधी योजनेची घोषणा केली. नाशिक मनपाने २६,२३४ (१४७ टक्के) पथविक्रेत्यांनी योजनेसाठी बँकेकडे ऑनलाइन अर्ज केले. बँकांनी २४,५८४ (१३८टक्के) कर्ज प्रकरणे मंजूर केली. त्यापैकी २२,०८६ (१२४टक्के) पथविक्रेत्यांना आतापर्यंत कर्जाचे वितरण केले आहे.

खासदार स्वयंरोजगार कर्ज वितरण मेळाव्यात नाशिक मनपा पीएम स्वनिधी अंतर्गत ५२४ पथ विक्रेत्यांना परिचय बोर्ड तसेच ११० पथविक्रेत्यांना क्यूआरकोड तसेच १२६ पथविक्रेत्यांना ५०, २० आणि १० हजारांचे कर्ज वितरण केल्याची माहिती मनपा उपआयुक्त करुणा डहाळे यांनी दिली.

पायलट शहरांमध्ये नाशिकची निवड

पथविक्रेत्यांना डिजिटल माध्यमाबाबत प्रशिक्षित करणे व त्याचा वापर करण्याचा दृष्टिकोन डिजिटल पेमेंट एग्रीगेटर यांच्या सहायाने पथविक्रेत्यांचे डिजिटल ऑनबोर्डिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच पीएम स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज मिळालेल्या सर्व पथविक्रेत्यांना डिजिटल व्यवहार केल्यास प्रती व्यवहार १ रुपया कॅशबॅक मिळणार आहे. केंद्र शासनाने पीएम स्वनिधी योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण (सोशल इकॉनॉमी प्रोफायलिंग) करण्यासाठी देशभरातून पहिल्या टप्प्यात १२५ पायलट शहरांमध्ये नाशिक मनपाची निवड केली. मनपाने १४,२३४ पथविक्रेत्यांची सर्वेक्षण करून अव्वल स्थान मिळविले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम appeared first on पुढारी.