नाशिक पदवीधरचा आज फैसला, सय्यदपिंप्रीतील शासकीय गोदामात मतमोजणी

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी गुरुवारी (दि. 2) मतमोजणी होत आहे. जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यदप्रिंपी गोदामात सकाळी 8 पासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वत्र उत्सुकता असून, त्याचे उत्तर अवघ्या काही तासांत मिळणार आहे.

राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ३0) झालेल्या मतदानावेळी विभागातील पाचही जिल्ह्यांतील 49.28 टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. विभागातून १ लाख २९ हजार ४५६ पदवीधर मतदारांनी 16 उमेदवार यांचे भवितव्य मतपेटीतून बंद केले आहे. तरी खरी चुरस ही अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यातच पाहायला मिळते आहे. तसे असले तरी शेवटी विधान परिषदेची पायरी कोण चढणार हे आज गुरुवार मतमोजणीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सय्यदप्रिंपी येथील गोदामात सकाळी ८ पासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. तबल २८ टेबलांवर मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका एकत्रित करून त्याचे एक-एक हजारांचे गठ्ठे करण्यात येतील. त्यानंतर १६ उमेदवार आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. दरम्यान, अवैध मतपत्रिका बाजूला केल्यानंतर उरलेल्या वैध मतपत्रिकांची मोजणी करून त्याद्वारे विजयासाठीचा आवश्यक कोटा निश्चित केला जाईल. मतमोजणीत जो उमेदवार पहिल्या पसंतीच्या क्रमवारीत आवश्यक कोटा पूर्ण करले, त्याला विजयी घोषित करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधरचा आज फैसला, सय्यदपिंप्रीतील शासकीय गोदामात मतमोजणी appeared first on पुढारी.