नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अवघे ‘इतके’ टक्के मतदान, गुरुवारी फैसला

मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ३०) झालेल्या मतदानावेळी विभागातील मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला. विभागात पाचही जिल्ह्यांतून अवघे ४9.28 टक्के मतदान झाले आहे. जळगावला सर्वाधिक 51.44 टक्के मतदान झाले. नाशिकला सर्वात कमी म्हणजे 45.85 टक्के मतदान झाले. गुरुवारी (दि. २) नाशिक येथे मतमोजणी पार पडेल.

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ३०) सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत मतदान पार पडले. यावेळी १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करण्यात झाले असले, तरी सर्वाधिक चुरस ही अपक्ष सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात बघायला मिळत आहे.

गेल्या १५ दिवसांत घडलेल्या राजकीय नाट्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्रत्यक्ष ४9.28 टक्के मतदान झाले आहे. विभागातील एकूण 2 लाख 62 हजार 678 पैकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे २०१७ साली झालेल्या निवडणुकीवेळी तब्बल ५४.३८ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली होती. त्यामुळे गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा पदवीधर मतदारांमध्ये निरुत्साह पाहायला मिळाला. परिणामी पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा तब्बल 5.१० टक्के कमी मतदानाची नोंद झाली आहे.

नाशिक शहर व परिसरात सकाळच्या सुमारास धुके व ढगाळ हवामानामुळे मतदारांनी केंद्राकडे पाठ फिरवली. तर ग्रामीण भागातील केंद्रावर मतदानाचा फारसा उत्साह दिसून आला नाही. जिल्ह्यात 45.85 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. नगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. याशिवाय, धुळे व नंदुरबारमध्ये अनुक्रमे 50.50 व 49.61 टक्के मतदान झाले. दरम्यान, पाचही जिल्ह्यांतील मतपेट्या या नाशिकच्या सय्यद पिंप्री येथील जिल्हा निवडणूक शाखेच्या गोदामात आणल्या जाणार आहेत. याच ठिकाणी गुरुवारी (दि. २) सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे आता सर्व राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

आयुक्त गमेंचे मतदान

नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गंगापूर रोडवरील आनंदवली येथील महानगरपालिकेच्या शाळेत सकाळी 8 ला मतदानाचा हक्क बजावला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूल उपआयुक्त रमेश काळे यांनीदेखील याच केंद्रावर मतदान केले. या व्यतिरिक्त अपर जिल्हाधिकारी अरुण आनंदकर व संपदा आनंदकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला.

संकेतस्थळ ठरले त्रासदायक

पदवीधर निवडणुकीत मतदारांना त्यांचे नाव मतदारयादीत शोधण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले होते. या संकेतस्थळावरून सुलभतेने मतदारांना त्यांचे यादीतील नाव शोधता येईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हे संकेतस्थळ कुचकामी ठरले. एकापेक्षा अनेकदा लॉगिन करूनही नाव सापडत नसल्याने मतदारांसाठी ते त्रासदायक ठरले होते. जिल्हा निवडणूक शाखेतील एका अधिकाऱ्याने या संकेतस्थळाद्वारे यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न केला असता, पदरी निराशा पडली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने दुपारी २ नंतर सहज म्हणून पत्नीचे नाव संकेतस्थळावर शोधले असता ते सापडले.

विभागातील मतदान

जिल्हा : टक्केवारी

नाशिक : 45.85

नगर: 50.40

जळगाव : 51.44

धुळे : 50.50

नंदुरबार : 49.61

एकूण : 49.28

हेही वाचा : 

The post नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अवघे 'इतके' टक्के मतदान, गुरुवारी फैसला appeared first on पुढारी.