नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक

नाशिक पदवीधर मतदारसंघ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.5) नामनिर्देशनाच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असून, त्यामुळे विभागीय आयुक्तालयात सोमवारनंतर (दि.9) गर्दी होणार आहे.

पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला असून, निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांतील इच्छुकांसाठी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अर्ज भरायच्या पहिल्या दिवशी विभागातून एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रशासनाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आयुक्तालयात सोमवारपासून (दि.9) रीघ लागणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे हेच उमेदवारी करणार आहेत. दुसरीकडे भाजपकडून इच्छुकांची रीघ लागली आहे. पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत अद्यापही गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण, यावरून विभागातील पाचही जिल्ह्यांत उत्सुकता ताणली गेली आहे.

याद्या अद्ययावत करणार…
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 3 जानेवारीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या 10 दिवसांपूर्वी पदवीधर मतदार नोंदणीकरिता प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करता येईल. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीकरिता नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दि. 12 जानेवारी आहे. आयोगाच्या संदर्भीय पत्रातील सूचनांप्रमाणे पदवीधर मतदार नोंदणीकरिता प्राप्त नोंदणी अर्जावर कार्यवाही करून मतदारयादी अद्ययावत करण्यात येईल, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपआयुक्त रमेश काळे यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक appeared first on पुढारी.