नाशिक पदवीधर निवडणूक : नगरच्या मतपेट्या पहाटे साडेपाचला पोहोचल्या

नाशिक पदवीधर निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पदवीधर निवडणुकीतील मतपत्रिकांच्या पेट्या सय्यद पिंप्री येथील गोदामाच्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाची वेळ संपल्यानंतर रात्री 11.15 ला सर्वात आधी नाशिकच्या पेट्या गोदामात दाखल झाल्या. मंगळवारी (दि. ३१) पहाटे 5.30 ला नगरच्या मतपेट्या गोदामात दाखल झाल्या. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपआयुक्त रमेश काळे यांनी दिली.

पदवीधर निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यांत सोमवारी (दि. ३०) मतदान पार पडले असून, तब्बल ४९.२८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक, नगर, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील एकूण ३३८ केंद्रांमध्ये हे मतदान घेण्यात आले. सकाळी ८ ते दुपारी 4 अशी मतदानाची वेळ असतानाही अनेक केंद्रांसमोर सायंकाळी 6पर्यंत रांगा होत्या. दरम्यान, मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतमोजणीकडे साऱ्यांचे वेध लागले आहे.

सय्यद पिंप्री येथील जिल्हा निवडणूक शाखेच्या गोदामात पाचही जिल्ह्यांतील मतमोजणी केली जाणार आहे. सोमवारी (दि. ३०) मतदानाची वेळ संपल्यानंतर रात्री ११.१५ ला नाशिक जिल्ह्याच्या मतपेट्या गोदामात पाेहोचल्या. त्यानंतर मध्यरात्री 1.30च्या सुमारास धुळे व त्यानंतर 2 ला नंदुरबारच्या पेट्या गोदामात दाखल झाल्या. मंगळवारी (दि. ३१) पहाटे 4ला जळगाव, तर 5.30ला नगर जिल्ह्याच्या पेट्या गोदामात पोहोचल्या. सर्व पेट्या संकलित करून त्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोदामाला भेट देत मतमोजणीच्या तयारीची पाहणी केली. यावेळी उपआयुक्त उन्मेष महाजन, तहसीलदार साहेबराव सोनवणे व राजेंद्र नजन, सहायक संचालक (लेखा) विजय सोनवणे, नायब तहसीलदार राजेश अहिरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांचा बंदोबस्त

मतपेट‌्या असलेल्या स्ट्राँगरूमसह गोदाम परिसरावर सीसीटीव्हींची निगराणी ठेवण्यात आली आहे. मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने मतमोजणी केंद्रात आवश्यक असेल तेथे बॅरिकेडिंगची व्यवस्था केली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधर निवडणूक : नगरच्या मतपेट्या पहाटे साडेपाचला पोहोचल्या appeared first on पुढारी.