नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदार संघासाठी धुळ्यात आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीतील अपक्ष तथा महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शाळा क्रमांक आठ मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. जनतेने मतदान करून धनशक्ती विरोधातला हा लढा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज धुळ्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. मात्र सकाळी महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी शाळा क्रमांक आठ मधील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भविष्यात शिक्षक आणि पदवीधर यांच्या विकासाचा विचार करूनच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदानाचा हक्क निर्माण करून दिला. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. या निवडणुकीत जनतेने केवळ आपले एक मत देऊन धनशक्ती विरोधातील हा लढा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. या मतदारसंघातील उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजयाचा दावा केल्याच्या संदर्भात त्यांनी टीका केली आहे. विजया संदर्भात कोणीही दावा करणे अयोग्य नाही. पण जनतेने ठरवलेली बाब मतमोजणीनंतर सत्य बाहेर येणार असून जनतेचाच विजय होणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान याच मतदार केंद्रावर साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळाताई गावित यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मतदान हे पवित्र कार्य असून जनतेने त्यांना वाटेल त्या उमेदवारास मतदान केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आतापर्यंत इतकं मतदान

दरम्यान सकाळच्या सञात पाचही जिल्ह्यांमधून अवघे 6.52% मतदान झाल्याची नोंद झाली आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातून 1158, धुळे जिल्ह्यातून 1534, जळगाव जिल्ह्यातून 2267, नाशिक जिल्ह्यातून 3822 तर अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक 8334 असे एकूण 17,115 मतदान झाले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.