नाशिक : पदवीधारकांसाठी 1 फेब्रुवारी 2023 पासून ’पीआयएल’ योजनेला सुरुवात

भारतीय डाक www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ
ब्रिटिश सरकारच्या काळात 1 फेब्रुवारी 1884 मध्ये ‘पोस्टल लाइफ इन्शुरन्स’ ही कल्याणकारी योजना टपाल खात्याच्या कर्मचार्‍यांसाठी सुरू केली होती. 1888 मध्ये टेलिग्राफ, केंद्रीय, राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी होती. आता पीआयएल योजना 1 फेब्रुवारी 2023 पासून मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या डिग्री, डिप्लोमा, आयटीआय, वकील, एमबीए व इतर कोर्सेस झालेल्या तरुणांसाठी खुली करण्यात आली आहे. या तीन महिन्यांत तरुणांचा या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत असून, त्यापोटी टपाल खात्याकडे करोडो रुपये जमा झाले. कमी वयात योजना घेतल्यास प्रीमियम कमी लागत असून, लाभ दीर्घकाळासाठी मिळतो.

बोनससह विमा रक्कम 50 लाखांपर्यंत 
विमा खरेदी करण्याची वयोमर्यादा 19 ते 55 वर्षे निश्चित केली आहे. या योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला 80 वर्षे वयानंतर किमान 20 हजार रुपये बोनस आणि कमाल 50 लाख रुपये विमा रक्कम मिळते. दरम्यान, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला ही रक्कम मिळते. सरकारी योजना असल्यामुळे यामध्ये शेअर मार्केटसारखी कोणतीही रिस्क नाही.

कर्ज सुविधा :
विमा योजनेत 4 वर्षे पॉलिसी सुरू ठेवल्यास विमाधारकाला त्याच्यावर कर्ज घेण्याची सुविधा दिली जाते. योजना दीर्घकाळ नको असल्यास 3 वर्षांनंतर सरेंडर करता येते. परंतु 5 वर्षांपूर्वी सरेंडर केल्यास त्यावर बोनसचा लाभ मिळत नाही. 5 वर्षांनंतर सरेंडर केल्यावर विमा रकमेवर बोनस दिला जातो.

कोण लाभ घेऊ शकतो?
योजनेला विस्तारित करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजना निमशासकीय, राष्ट्रीयीकृत बँका, सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक सरकारी संस्था, वित्तीय संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकत होते. परंतु 2017 नंतर डॉक्टर, अभियंते, वकील, व्यवस्थापन सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, बँकर्स आणि कर्मचारी इत्यादी सर्व विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ऑनलाइन योजना खरेदी करता येऊ शकते.

फायदे पण जाणून घ्या
या योजनेत विमाधारकाला करात सूट मिळते. पोस्टल लाइफ इन्शुरन्समध्ये भरलेल्या प्रीमियमसाठी आयकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत सूट मिळू शकते. या योजनेत प्रीमियम भरण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक असा पर्याय दिला जातो. सोयीनुसार पर्याय निवडता येतो. विमा 59 वर्षांच्या वयापर्यंत एंडोमेंट अ‍ॅश्युरन्स पॉलिसीमध्ये रूपांतरित करता येतो. आगाऊ हप्ते भरल्यास सूट मिळते. देशातील कोणत्याही पोस्टात हप्ते भरण्याची सुविधा व ऑनलाइन प्रीमियम भरण्याची सुविधा असते.

The post नाशिक : पदवीधारकांसाठी 1 फेब्रुवारी 2023 पासून ’पीआयएल’ योजनेला सुरुवात appeared first on पुढारी.