नाशिक : पब्लिक बायसिकल प्रकल्पातील शेअरिंग सायकली गरजू विद्यार्थिनींना देणार

पब्लिक सायकल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका तसेच स्मार्ट सिटी योजनेंंतर्गत सुरू करण्यात आलेला पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प अल्पावधीतच प्रतिसादाअभावी बंद पडल्याने या उपक्रमातील सुमारे 650 सायकली धूळ खात पडून आहे. यामुळे या सायकल दुरुस्त करून त्या महापालिका शाळांमधील गरजू विद्यार्थिनींना वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

सार्वजनिक दळणवळण वाढावे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चार वर्षांपूर्वी नाशिकमध्ये पब्लिक बायसिकल शेअरिंग उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी हीरो निऑन प्रा. लि. या कंपनीबरोबर करार करण्यात आला होता. या उपक्रमांंतर्गत कंपनीने शहरात विविध ठिकाणी सायकल्स नागरिकांना उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, नागरिकांचा अल्प प्रतिसाद आणि नियोजनाअभावी हा उपक्रम अल्पावधीतच बंद पडला. विशेष स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांनी या उपक्रमाकडे योग्य लक्ष न पुरविल्याने उपक्रम बंद करावा लागला. प्रकल्प बंद पडल्यामुळे संबंधित कंपनीबरोबरचा करार महापालिकेने रद्द केला. त्यामुळे या प्रकल्पातील सायकली आडगाव येथील ट्रक टर्मिनसच्या गोदामामध्ये जमा करण्यात आल्या आहेत. अनेक सायकली नादुरुस्त असल्याने त्या दुरुस्त करून मनपा शाळेतील गोरगरीब विद्यार्थिनींना त्यांचे वाटप करण्याची मागणी अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार शिक्षण प्रशासनाधिकारी सुनीता धनगर व स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांच्याकडेही पाठपुरावा केला असता कंपनीच्या संचालक मंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन मोरे व धनगर यांच्यासह जायभावे यांनी सायकलींची पाहणी केली. या उपक्रमांंतर्गत गरजू विद्यार्थिनींना दिल्या जाणार्‍या सायकलची देखभाल दुरुस्ती मनपामार्फत करण्यात येणार असून, शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सायकल जमा करून नव्या शैक्षणिक वर्षात पुन्हा इतर गरजू विद्यार्थिनींना त्याचे वाटप केले जाणार असल्याचे मनपा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : पब्लिक बायसिकल प्रकल्पातील शेअरिंग सायकली गरजू विद्यार्थिनींना देणार appeared first on पुढारी.