नाशिक : परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने गंगापूर धरणाची दारे बंद

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने गंगापूर धरणाची दारे बंद करण्यात आली, तर दारणा, पालखेडसह अन्य धरणांच्या विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात संपूर्ण हंगामात पावसाने सातत्य राखल्याने प्रमुख 24 धरणे काठोकाठ भरली असून, त्यामध्ये 99 टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटीसद़ृश पाऊस झाल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहात आहेत. तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसाने पाण्याची आवक चांगली झाली. त्यामुळे गंगापूर, दारणा, पालखेडसह तब्बल 20 प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

गत चार महिन्यांमध्ये जिल्ह्यात अनेकदा मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी झाली. त्यानंतर परतीच्या पावसाने सिन्नर, नाशिक, निफाड, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यांना झोडपून काढले. त्यामुळे पावसाने थांबावे, अशी अपेक्षा जिल्हावासीयांमधून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शनिवार (दि.23) पासून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे गंगापूर धरणाची दारे बंद करण्यात आली आहेत. अन्य धरणांच्या विसर्गातही टप्प्याटप्प्याने घट करण्यात येत आहे. दारणातून सध्या 250 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. याशिवाय कडवातून 212, वालदेवीतून 65, आळंदीतून 30, भोजापूरमधून 539, तर पालखेडमधून 875 क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे.

धरणासाठा (दलघफू)

गंगापूर ः 5,630, दारणा ः 7,149, कश्यपी ः 1,852, गौतमी गोदावरी ः 1,868, आळंदी ः 816, पालखेड ः 653, करंजवण ः 5,371, वाघाड ः 2,302, ओझरखेड ः 2,130, पुणेगाव ः 620, तिसगाव ः 455, भावली ः 1,434, मुकणे ः 7,097, वालदेवी ः 1,133, कडवा ः 1,688, नांदूरमध्यमेश्वर ः 44, भोजापूर ः 361, चणकापूर ः 2,427, हरणबारी ः 1,166, केळझर ः 572, नागासाक्या ः 397, गिरणा ः 18,500, पुनद ः 334, माणिकपुंज ः 1,640.

हेही वाचा :

The post नाशिक : परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने गंगापूर धरणाची दारे बंद appeared first on पुढारी.