नाशिक : पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला २०० ट्रॉली चारा आगीत भस्मसात

मका www.pudhari.news

नाशिक (सटाणा): पुढारी वृत्तसेवा

सटाणा तालुक्यातील खमताणे येथील शेतात चार शेतकऱ्यांनी मिळून पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला व एकत्रित रचून ठेवलेला मक्याचा तब्बल २०० ट्रॉली मक्याचा चारा सोमवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. या चाऱ्यासोबतच एका शेतकऱ्याचा २० ट्रॉली मकाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला असून आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

खमताणे गावातील नवेगाव रस्त्यालगत गट नंबर ४५९ मध्ये धर्मा नानाजी इंगळे यांचे ४८ ट्रॉली, विजय दयाराम इंगळे यांचे १०३ ट्रॉली, वसंत दयाराम इंगळे यांचे १३ ट्रॉली व वाल्मीक रामदास इंगळे यांचे १५ ट्रॉली मक्याचा चारा एकत्रितरित्या रचून ठेवलेला होता. त्यासोबतच वाल्मीक इंगळे यांचे मक्याचे २० ट्रॅक्टर मक्याचे कणीस ठेवलेले होते. सोमवारी (दि.२) रात्री आठनंतर अज्ञात इसमाने या कोरड्या चाऱ्यास आग लावल्याचे निदर्शनास आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चाऱ्यास आग लागल्याचे दिसताच आजूबाजूच्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. यावेळी सटाणा नगरपालिका व मालेगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनाही पाचारण करण्यात आले. शिवाय परिसरातील दहाहून अधिक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर टँकरच्या साह्यानेही पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. चारा विझविण्यासाठी मुंजवाड येथील धाबळे व हरी जाधव यांनी जेसीबीही उपलब्ध करून दिले. तसेच जवळील मुंजवाड, नवेगाव, निरपूर तिळवण, पिंपळदर येथील शेकडो युवकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी सहकार्य केले. भीषण आगीमध्ये जवळपास २०० ट्रॅक्टर ट्रॉली मका चारा जळून भस्मसात झाला. तसेच २० ट्रॉली मक्याचे कणीसही आगीत भस्मसात झाले आहे. मंगळवारी (दि.३) सायंकाळपर्यंत आग धुमसत होती. मंगळवारी (दि.३) आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चाऱ्यास जाणीवपूर्वक आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून याठिकाणाहून जवळील ओल्या शेतातून पळून जाताना अज्ञात इसमाचे पायाचे ठसे देखील उमटल्याचे दिसून आले आहे. पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनीही पोलीस दलासह रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

शेतकऱ्यांची लाखोंची हानी..

नुकसान झालेले चारही शेतकरी पशुपालक असून अल्पभूधारक आहेत. शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दुभत्या जनावरांसाठी त्यांनी परिसरातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांकडून मक्याचा कोरडा चारा खरेदी करून तो एकाच ठिकाणी रचून ठेवला होता. लवकरच यंत्राच्या साह्याने त्याची कुट्टी करण्यात येणार होती. परंतु त्यापूर्वीच सर्व चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून शेतकऱ्यांची लाखोंची हानी झाली आहे. या दुभत्या जनावरांना नव्याने चारा कसा उपलब्ध करावा, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

आगीत शेतकऱ्यांच्या गुरांसाठीचा साठवणूक करण्यात आलेला चारा भस्मसात झाल्याने त्यांच्यासमोर पशुंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पंचनामा करून मदत द्यावी तसेच आगीच्या ठिकाणाजवळ अज्ञात इसमाच्या पावलांचे ठसे उमटल्याने ही घटना ही हेतूपुरस्कर घडल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी करून यातील गुन्हेगाराचा शोध लावावा. – कुबेर बापू जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक.

हेही वाचा:

The post नाशिक : पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला २०० ट्रॉली चारा आगीत भस्मसात appeared first on पुढारी.