नाशिक : पशुधनाची चोरी करणारी टोळी ताब्यात

www.pudhari.news

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील आहेरवाडी शिवारातील डोंगराच्या जवळपास असणार्‍या झाडींमुळे आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ गुरांना चरण्यासाठी येथे आणतात. मात्र, चरण्यासाठी आणलेल्या गुरांना चोरून परस्पर वाहनात नेऊन व्यापार्‍यांकडे विक्री करत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरे चोरणार्‍या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिवारात चरण्यासाठी आणलेल्या जनावरांना सराईत भामटे चोरून वाहनातून नेत संंगनमताने व्यापार्‍यांना विक्री करण्याचा चोरट्यांचा नित्याचा धंदा सुरू होता. त्याचप्रमाणे आहेरवाडी येथील नामदेव जोरावर यांची गाय चारण्यासाठी आणली असता त्यांच्या मालकीची गाय अज्ञाताकडून एका टाटा पिकअप वाहनातून चोरटे घेऊन जात असताना त्यांनी पाहिले. त्यांनी लगेच या वाहनाचा पाठलाग करून वाहनचालकाला नगरसूल येथील लहवित रोड वसंत बंधार्‍याजवळ अडविले. यावेळी वाहनचालकाने जोरावर यांच्यावर हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहनचालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वाहनात दोन गायी आढळून आल्या असून, वाहनचालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. साईनाथ बन्सी सोनवणे, रतन सूर्यभान पवार, भाऊलाल आहेर, संतोष अंबादास साबळे (रा. खिर्डीसाठे) अशी संशयितांची नावे असून, पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसूलचे सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. जे. पारखे, पी. सी. मोरे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : पशुधनाची चोरी करणारी टोळी ताब्यात appeared first on पुढारी.