Site icon

नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील कारसूळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची नेमणूक होईपर्यंत शाळा उघडू न देण्याचा पवित्रा घेत शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले.

शालेय व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १४) शाळेला भेट देऊन शाळा बंद न ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी मागण्या मान्य होइपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा इशारा दिला होता. कारसूळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांची पेसा अंतर्गत बदली झाली. मात्र, त्या जागेवर नवीन शिक्षकांची नेमणूक झाली नाही. पीएमश्री दर्जा मिळालेल्या शाळेला शिक्षक मिळणार नसतील, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गुरुवारी (दि. 15) विद्यार्थी शाळेत आले, मात्र पालकांनी कुलूप ठोकल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा आनंदोत्सव होऊ शकला नाही.

कारसूळ शाळेला शिक्षक मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे असताना, विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस, पुस्तक द्यायचे असताना कारसूळ येथील पीएमश्री शाळेला कुलूप ठोकण्याची नामुश्की आमच्यावर ओढवली. शाळेला तत्काळ शिक्षक द्यावेत. – देवेंद्र काजळे, सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाकचौरे, उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे, उपसरपंच श्यामराव शंखपाळ, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कंक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य भाऊसाहेब उगले, धर्मराज पगार, नितीन दाते, शरद देवरे, योगेश जाधव, अमोल ताकाटे, विलास ताकाटे, उमेश शिंदे, नाना गवळी, सुभाष निकम, पुंडलिक क्षीरसागर, सुनील ताकाटे, भाऊराव जाधव, कैलास गवळी, संदीप सगर, सुनील गवळी, अर्चना धुळे, सिंधुबाई धुळे, सविता गवळी आदी पालक उपस्थित होते.

सुटीनंतर आज राज्यातील शाळा सुरू झाल्या. परंतु आमच्या शाळेला शिक्षक नसल्यामुळे टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. शाळेची पटसंख्या २३६ आहे. शाळेला पीएमश्री मानांकनामुळे १ कोटी ८८ लाख मिळणार आहेत. जर पदवीधर शिक्षक नसतील, तर ती शाळा सुरू ठेवून काय उपयोग? – सचिन वाघचौरे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती.

हेही वाचा:

The post नाशिक : पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप appeared first on पुढारी.

Exit mobile version