नाशिक : पांजरापोळमध्ये दीड हजार गोवर्गीय जनावरे

cow www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चुंचाळ येथील बहुचर्चित पांजरापोळच्या जागेत दीड हजार गोवर्गीय जनावरे आढळून आली असून, तसेच 111 उंटही आहेत. एकूण 1 हजार 611 पाळीव जनावरे आढळल्याची माहिती नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी दिली आहे. तेथील वनसंपदा व वन्यप्राण्यांचा अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या दीड महिन्यापासून चुंचाळेतील पांजरापोळची जागा एमआयडीसाला देण्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. नाशिक शहराची ऑक्सिजन फॅक्टरी असलेल्या पांजरापोळची जागा उद्योगासाठी देण्याला पर्यावरणवादी तसेच नाशिककरांचा कडाडून विरोध आहे. तर सदर जागा उपलब्ध व्हावी यासाठी उद्योजकांनी सर्वतोपरी वजन वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या जागेचा वाद थेट मंत्रालयात पोहोचला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पांजरापोळ जागेसंदर्भात समिती गठीत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांनी महसूल, कृषी, पुशसंवर्धन, जलसंपदा, वनविभाग तसेच अन्य विभागांची समिती गठीत केली आहे. त्याचे अध्यक्ष नाशिक तहसीलदारांना करण्यात आले आहे. समितीने जागेवर जाऊन तेथील वनसंपदा, पशु-पक्षी, पाण्याचे स्त्रोत आदींचा सविस्तर अहवाल तयार करून तो सादर करायचे आहे. त्यानुसार समितीने गेल्या आठवड्याभरापासून जागेवर जाऊन पाहणी सुरू केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांनी सोमवारी (दि. 8) बैठक घेत आतापर्यंतचा कामकाजाचा आढावा घेतला. समितीने केलेल्या आतापर्यंतच्या पाहणीत चुंचाळे येथील पांजरापोळच्या जागेत 260, पेठ रोडला 850, पंचवटीत 390 असे 1500 गोवर्गीय जनावरे आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी 111 उंटही येथे दाखल झाली आहेत. तेथील झाडे व वन्यप्राण्यांची माहिती बाकी असून, पुढील 2 ते 3 दिवसांत ती प्राप्त होईल. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना सविस्तर अहवाल सादर केला जाईल, असे बहिरम यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : पांजरापोळमध्ये दीड हजार गोवर्गीय जनावरे appeared first on पुढारी.