नाशिक : पांजरापोळ जागेसाठी पर्यावरणप्रेमींची एकजूट

पांझरपोळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चुंचाळे येथील पांजरापोळच्या ८२५ एकर जागेवर वसलेल्या जैवविविधता व जंगलाच्या समर्थनार्थ नाशिकमधील पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. गिव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून विविध ३८ संस्थांनी सोमवारी (दि. २७) पांजरापोळ वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना मागणीचे निवेदन दिले.

पांजरापोळची चुंचाळे व बेळगाव ढगा येथील ८२५ एकर जागेवर औद्योगिक वसाहत उभारण्याचा शासनाचा घाट आहे. नाशिकमध्ये विविध स्तरांतून शासनाच्या या निर्णयाला विरोध होतो आहे. या मुद्यावरून गिव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात स्वत:च्या फायद्यासाठी काही राजकीय नेते, अधिकारी व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी संगनमताने चुंचाळेतील पांजरापोळच्या जागेवर एमआयडीसी आणण्याचा घाट घातला आहे. याद्वारे नाशिकच्या चांगल्या वातावरणास सुरुंग लावायला सुरुवात केली आहे.

चुंचाळे येथील पांजरापोळच्या जागेला भेटी दिली असता तेथे ४०० हून अधिक मोर, ४ बिबटे, तरस, कोल्हे व ५६ हून अधिक प्रकारचे पक्षी, दुर्मीळ कीटक तसेच जैवविविधता आढळून आली. या भागात अडीच लाखांहून जास्त वृक्ष आणि ३२ तळी आहेत. त्यामुळे ही जागा म्हणजे अंबड व सातपूर एमआयडीसीतून निघणारा कार्बन उत्सर्जन शोषून घेणारे फुफ्फुसच आहे. येथील तळ्यांमधूनच लाखो लिटर पाणी जमिनीत झिरपून ते अंबड व सातपूर एमआयडीसी, या भागातील शेतकरी व नंदिनी नदीला पाणीपुरवठा करते. त्यामुळे जागेचे महत्त्व बघता सदर पांजरापोळची जमीन एमआयडीसीसाठी किंवा कोणत्याही शैक्षणिक व शासकीय इमारतींसाठी देण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर राजेश अय्यर, राम खुर्दळ, नितीन शुक्ल, भूषण जाधव, दिगंबर काकड, जितेंद्र भावे यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : पांजरापोळ जागेसाठी पर्यावरणप्रेमींची एकजूट appeared first on पुढारी.