नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका

पंचवटी मखमलाबाद रोड www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

मखमलाबाद राेड, पेठ रोड आणि दिंडोरी रोड ओलांडून जाणाऱ्या डाव्या कालव्यात (पाटात) साचलेले पाणी अक्षरश: सडले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात कचराही साचलेला आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे पाटालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित पाटबंधारे विभाग आणि मनपाने संयुक्तपणे याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पावसाळा असल्याने अनेक दिवसांपासून पाटबंधारे विभागाने पाटातील पाण्याचा विसर्ग बंद केलेला आहे. त्यामुळे या पाटामध्ये सध्या पावसाचे पाणी साचलेले असून, या पाण्यात प्लास्टीक पिशव्या, बाटल्या, कागद, कापड, निर्माल्य अशा प्रकारचा कचराही मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे. मखमलाबाद रोड ते थेट अमृतधाम, निलगरी बागपर्यंत पाटामधील पाणी अक्षरशः सडले आहे. त्यावर मधमाशांच्या मोहळाप्रमाणे डासांचे थवेच्या थवे दिसत आहेत. पाटामध्ये घाण आहेच, परंतु आजूबाजूलाही गाजरगवत वाढलेले असून, कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. आधीच नाशिक शहरात विविध प्रकारचे साथीचे आजार बळावले आहेत. त्यात भरीस भर म्हणजे या पाटामध्ये सडलेले पाणी आहे. या पाटालगतच्या रस्त्याने मखमलाबाद शिवारापर्यंत पहाटे नागरिक फिरायला जातात. त्यांनाही या दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे संपूर्ण नाशिक शहराला साथीच्या आजारांचा विळखा पडू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या त्वरित या पाटाला पाणी सोडावे तसेच या पाटाच्या आजूबाजूला त्वरित स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

धोका वेळीच ओळखणे गरजेचे :

गंगापूर धरणापासून सुरू झालेल्या या पाटावर मनपा हद्दीत दहा ते बारा पूल आहेत. हे पूल ओलांडून दररोज हजारो नागरिक प्रवास करीत असतात. शिवाय या पाटालगत मोठ्या प्रमाणात इमारती, बंगले, चाळी, झोपड्या आहेत. यातील रहिवाशांची संख्या काही लाखात असल्याने पाटातील दुर्गंधीचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

पाटबंधारे-मनपाने समन्वय साधावा :

पाटाच्या आतील बाजूची जबाबदारी पाटबंधारे विभागाची तर, पाटाच्या बाहेरील बाजूची जबाबदारी मनपाची असल्याचे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. मात्र सध्या पाटाच्या आतमध्येही आणि पाटाच्या बाहेरील बाजूसही घाण आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांनी एकमेकांकडे बोट करण्यापेक्षा एकमेकांचे बोट धरून समन्वय साधत नागरिकांना या समस्येतून मुक्त करण्याची गरज आहे.

प्रशासनाने गोदावरीऐवजी या पाटाला पाणी सोडले तरच या दुर्गंधीयुक्त पाण्याचा बिमोड होईल, अन्यथा पंचवटीकरांना मोठ्या रोगराईला सामोरे जावे लागणार आहे. पाटबंधारे व मनपाचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी एक तास थांबले तरी हा विषय किती गंभीर आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. याबाबत मनपा आयुक्तांशी पत्रव्यवहार केलेला आहे. तथापि, मनपा व पाटबंधारे विभाग यांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी व हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. – सुनील केदार, भाजप सरचिटणीस, नाशिक.

हेही वाचा:

The post नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका appeared first on पुढारी.