Site icon

नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जून महिन्यात दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ आल्यास पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने, जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासन पाणीकपातीचे नियोजन करीत असून, याबाबतचा मंगळवारी (दि.11) निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणीकपातीचा निर्णय जाहीर होण्याआधीच शहरातील राजकारण पेटले असून, ठाकरे गटाने पाणीकपातीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा सावध पवित्रा दिसून येत आहे.

धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, अल निनो वादळामुळे यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यास नाशिककरांवर पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. चालू एप्रिल महिन्यात आठवड्यातून एक दिवस तर मे आणि जूनमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात करण्याबाबत महापालिका विचाराधीन आहे. गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रमुख अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन पाणीकपातीच्या आराखड्यावर चर्चा केली. वास्तविक, सद्यस्थितीत जुलैपर्यंत नाशिककरांना पाणी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, पावसाळा लांबणीवर पडल्यास नाशिककरांवर पाण्याचे संकट ओढवू शकते. अशात पाणीकपातीचा निर्णय संयुक्तिक ठरेल, असा विचार महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य शासनाला दिला असून, त्यावर मंगळवारी (दि.11) निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, निर्णयाआधीच शहरातील राजकारण पेटले असून, ठाकरे गटाकडून पाणीकपातीच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला असून, प्रशासनाचा हा निर्णय अतिघाईचा असल्याचे मत पक्षाकडून नोंदविण्यात आले आहे. पाणीकपात निर्णयाविरोधात इतरही पक्ष पुढे येण्याची शक्यता असल्याने, महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेत याबाबतची घोषणा राज्य शासनाकडूनच केली जावी असा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

15 हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यांतील धरणांमध्ये पाच टक्के इतका कमी जलसाठा आहे. नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरण समूहात गेल्या वर्षी 59 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा 57 टक्के पाणीसाठा आहे. आठवड्यातून एकदा पाणीकपात केल्यास महिन्यात चार दिवसांचे 2400 दशलक्ष पाणीबचत होईल. पुन्हा पाच दिवस पाणीकपात केली तर तीन हजार दशलक्ष पाणीबचत होईल. तीन महिन्यांचा विचार केल्यास 15 हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत होईल.

आजच्या स्थितीत जिल्ह्यातील धरण समूहात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. अशात पाणीकपातीचा लगेच निर्णय घेणे घाईचे ठरेल. एक दिवस जरी पाणी आले नाही तरी, त्याचा परिणाम पुढचे तीन ते चार दिवस होतो. सिडको, सातपूर, जुने नाशिक या भागातील रहिवाशांकडे पाणीसाठा करण्याचे कोणतेही साधन नाही. अशात नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीकपात करण्याची घाई करू नये. – सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, ठाकरे गट.

हेही वाचा:

The post नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता appeared first on पुढारी.

Exit mobile version