नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था

धग पाणीटंचाईची लोगो www.pudhari.news

नाशिक (कळवण) : बापू देवरे
आदिवासी बांधवांनी धरणे व्हावे, पाण्याची साठवण व्हावी, यासाठी शासनाला जमिनी दिल्या. त्याच आदिवासी बांधव व जनतेच्या घशाला कोरड पडली, तरी धरण उशाला असून पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या पाण्यावर तालुक्यातील जनतेपेक्षा अन्य तालुक्यांतील जनतेचा अधिकार शासनाने लादल्याने पाणी असूनही ते मिळविण्यासाठी शासन यंत्रणेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आदिवासी जनतेवर आली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. तालुक्यातील 7 गावांच्या विहिरी अधिग्रहित केल्या असून, 5 प्रस्तावही आले आहेत.

कळवण www.pudhari.news

कळवण : तालुक्याच्या ग्रामीण भागात पाणी आटल्याने बंद असलेला हातपंप.

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असून, मे महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यात पाण्याचे मोठे स्रोत असलेली एकूण लहान – मोठी 17 धरणे असताना तालुक्यातील निम्म्याहून अधिक भाग तहानलेला आहे. शेतीसाठी तर नाहीच नाही पण पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. टंचाईग्रस्त गावातील प्रस्ताव आल्यावरच पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते, अशी दयनीय परिस्थिती असल्याने गावातील महिला नागरिक मात्र पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे. विहिरी, तळे, पाझर तलाव, धरणा यांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. चणकापूर धरणात 41 टक्के साठा शिल्लक आहे, तर पुनंद धरणात 76 टक्के साठा शिल्लक आहे.

kalwan www.pudhari.news
कळवण : कोरडाठाक पडलेला बंधारा.

पश्चिम भागातील अनेक गावे आणि त्यांच्या वाड्या – वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या भागात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा कायम स्रोत उपलब्ध नसल्याने दरवर्षी उन्हाळा आला की, पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या – वस्त्यांमधील नागरिकांना उन्हात वणवण करावी लागते. हंडाभर पाणी मिळण्यासाठी तासन्तास पाण्याच्या झर्‍याजवळ बसावे लागत आहे. यासाठी कामधंदा सोडून द्यावा लागत असल्याने थेंबभर पाण्यासाठी दिवस वाया जात आहे. तालुक्यातील बहुतांश हातपंप बंद आहेत. त्यामुळे काही पाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

panisatha www.pudhari.news
कळवण : बंधार्‍यातील घटलेला पाणीसाठा.

धरणात दरवर्षी मुबलक पाणीसाठा होतो. मात्र, या पाण्यावर तालुक्यातील नागरिकांचा जणू अधिकारच नसल्याची जाणीव होत आहे. उपलब्ध पाणी त्यांना मिळण्याऐवजी ते दुसरीकडे सोडण्यात येते. ज्या शेतकरी बांधवांनी धरणे बांधण्यासाठी स्वतःच्या जमिनी दिल्या, त्यांच्या उर्वरित शेतीसाठी तर सोडाच त्यांना पिण्यासाठीही पाण्याचा थेंब मिळत नाही, अशी परवड झाली आहे. तालुक्यातील पाणीटंचाईवर माणसे कशीतरी मात करीत आहेत. मात्र, गोठ्यातील आणि जंगलातील पशू-पक्षी यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे.
अलीकडे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने पशुधन संख्या घटली असून, त्यावर उपजीविका करणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. तालुक्यातील पशू-पक्षी संख्या घटत आहे. शासनाकडून जलस्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न अलीकडील काळात झाले. मात्र, या योजना राबविणार्‍या आणि प्रत्यक्ष त्याचे काम करणार्‍यांनी कामे निकृष्ट केली. या कामात भ्रष्टाचार झाला असताना, नागरिक तक्रारी करत असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. केलेल्या कामांमध्ये पाण्याचा एक थेंबही साठत नसल्याने याला कारणीभूत कोण, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

गडावर चारदिवसांआड पाणीपुरवठा
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आई सप्तशृंगीदेवीच्या गडावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. येथे पिण्याच्या पाण्यासाठी भवानी पाझर तलाव हा पाण्याचा एकमेव स्रोत आहे. देवीच्या गडावर संपूर्ण देशभरातून लाखो भाविक दर्शनास येतात. येणारे भाविक व देवस्थान व सप्तशृंगगड ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या पाझर तलावातूनच करते. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची कमतरता लक्षात घेता गरजेनुसार चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. खासगी टँकर भाड्याने आणून पाणी विकत घ्यावे लागत आहे.

सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणार्‍या भवानी तलावात जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपल्बध आहे. सध्या गडावर 3 दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायत अंतर्गत उपाययोजना केल्या आहेत. – राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य.

हेही वाचा:

The post नाशिक : पाण्याअभावी कळवण तालुक्यात नागरिकांसह पशू-पक्ष्यांचीही दयनीय अवस्था appeared first on पुढारी.