नाशिक : पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी – गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गावागावांमधील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे हे सत्कर्म असून, पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागातील योजना पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात शनिवारी (दि. 25) जिल्ह्यातील  सोहळा पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नितीन पवार व हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी सुभाष भुजबळ, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ऑनलाइन उपस्थिती लावत मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आजही गावांच्या निवडणुका या गटर, वॉटर आणि मीटरभोवती फिरणे हे दुर्दैवी आहे. 2024 पर्यंत गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी गावांची साथ आवश्यक आहे. त्यामुळे गावांनीदेखील पाणीपुरवठा योजनांकडे एक चळवळ, गावाची यात्रा समजून कामे करावे. सरपंचांनी हे भगीरथ कार्य समजून अधिकाधिक चांगल्या प्रकारे गावांसाठी योजना राबवून घ्यावी. ते करताना त्यात आपण ठेकेदार होेणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा कानपिचक्या दिल्या. भुसे यांनी गावपातळीवर पाण्याच्या साठवणुकीसाठी भूमिगत टाक्या उभारण्याची सूचना केली. डॉ. पवार यांनी गोदावरी प्रदूषणमुक्त व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. गोडसे यांनी जिल्ह्यातील 1,356 गावांमध्ये एकाचवेळी योजनांचा शुभारंभ होत असल्याचा आनंद असल्याचे सांगितले. खोसकर यांनी नियोजनाअभावी गावागावांमधील विहिरींची कामे अपयशी ठरत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील 2,400 हून अधिकच्या तसेच 1,356 गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सरपंच, सदस्य यांच्यासह 102 गावांमधील ग्रामस्थ ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

दाढीवाल्यांचे सरकार : भुसे
आ. खोसकर यांनी कार्यक्रमात मी कुपोषित असून, माझ्याकडे लक्ष देण्याची विनंती पाटील यांना केली. हाच धागा पकडून दादा भुसे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाढीवाल्यांचे सरकार आहे. त्यामुळे तुम्हीही दाढी वाढवा, अशी मिश्कील कोटी केली. खोसकर यांना दाढीवाल्यांच्या पक्षात सहभागी होण्याची ऑफर यावेळी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी - गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.