नाशिक : पात्रतेनुसारच वेतन पद्धत – ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांचा निर्णय

thakarey www.pudhari.news

सटाणा : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेत केवळ गुणवत्ता आणि विद्यार्थिहिताला महत्त्व आहे. गुणवत्तेनुसार शिक्षण संस्थेचे मूल्यमापन होते. येत्या काळात नवीन शैक्षणिक धोरणात बदल होताना ‘मविप्र’मध्येदेखील ठोस व धाडसी निर्णय होतील. प्रत्येक प्राध्यापक व कर्मचार्‍यांचेदेखील मूल्यांकन होईल. नजीकच्या काळात एकच पातळीवर असलेल्या आणि वेगवेगळ्या गुणवत्ता – कौशल्ये, पेटंट, रिसर्च पेपर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन मांडणार्‍या व्यक्तींचे पात्रतेनुसार आर्थिकस्तर ठरतील व पगारदेखील निरनिराळे असतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी जाहीर केले.

सटाणा महाविद्यालयातर्फे आयोजित नवनिर्वाचित कार्यकारी मंडळातील पदाधिकार्‍यांच्या सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालय विकास समितीचे अ‍ॅड. पंडितराव भदाणे होते. माझा कुणीही दलाल किंवा मध्यस्थी नाही, समाजहितासाठी तसेच संस्थेचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी योजना व कृती आराखडा घेऊन थेट माझ्याकडे यावे. जातीपाती अथवा गट-तटाचे राजकारण न करता न्यायपूर्ण निर्णय घेत प्रामाणिकपणे तुमच्या 100 टक्के अडचणी सोडवू. ‘मविप्र’मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण या ध्येयाने योगदान देणार्‍या प्रत्येक प्राध्यापक व कर्मचार्‍याला अमर्याद संधी, प्रोत्साहन व संपूर्ण सहकार्य आम्ही देत आहोत व ते कायम राहील. ही जागतिक दर्जाची संस्था बघण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य हवे, असे आवाहन अ‍ॅड. ठाकरे यांनी केले. मविप्रच्या 487 शाखांपैकी 1967 साली सर्वांत पहिले महाविद्यालय सटाणा येथे स्थापन झाले. कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय अर्थात सटाणा महाविद्यालयाला रद्दी नव्हे तर बुद्धीची परंपरा व आदर्शांचा प्रदीर्घ इतिहास आहे. येथे अनेक उच्चविभूषित व पेटंट प्राप्त प्राध्यापक हे टीम वर्कने समाज व विद्यार्थी हितासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करतात. ग्रामीण विद्यार्थी हितासाठी सटाणा महाविद्यालय कुठेही कमी नाही, महाविद्यालयाने एक वेगळी उंची गाठली असून, येथील ग्रामीण विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध परिषदेत सहभागी होत आहेत व जागतिक पातळीवर झेप घेत रिसर्च पेपर सादर करण्यासाठी कार्यरत आहेत, असे प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. कृष्णा गायकवाड यांनी सांगितले. दगा पाटील व दगा पगार यांनी धनादेश सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांना सुपूर्द केलेत. संगीत विभागाच्या एस. आर. गोसावी व समूहाने स्वागतगीत सादर केले. डॉ. आर. डी. वसाईत यांनी सूत्रसंचालन केले.

सत्कारार्थी असे….
यावेळी सर्व नवनिर्वाचित चिटणीस दिलीप वळवी, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अ‍ॅड. संदीप गुळवे (इगतपुरी), शिवाजी गडाख (निफाड), डॉ. प्रसाद सोनवणे (सटाणा), अ‍ॅड. आर. के. बच्छाव (मालेगाव), विजय पगार (देवळा), रमेश पिंगळे (नाशिक), महिला प्रतिनिधी शालनताई सोनवणे (बागलाण), माजी सेवक संचालक नानासाहेब दाते, माजी प्राचार्य एस. एस. गुंजाळ, डॉ. दिलीप धोंडगे, ताहाराबाद येथील प्राचार्य डी. डी. बच्छाव, बी. डी. चव्हाण, शेखर दळवी व उपस्थित सभासद आदींचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा :

The post नाशिक : पात्रतेनुसारच वेतन पद्धत - ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांचा निर्णय appeared first on पुढारी.