नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाची शिवसेना कामाला लागली असून, गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री दादा भुसे विशेष आढावा बैठक घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, मुहूर्तच लागत नव्हता. अखेर गुरुवारी (दि.3) मुहूर्त सापडला असून, गावठाण क्लस्टर, एसआरए, सिडकोतील घरे फ्री होल्ड करणे, पाणीपुरवठा योजना यासह विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.

सध्या नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट असली तरी नाशिक शहरात आपला जम बसविण्याकरता शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पालकमंत्री दादा भुसे यांनी पालकमंत्रिपदी निवड झाल्यावर एक धावती बैठक महापालिकेत घेतली होती. त्यानंतर त्यांनी 21 ऑक्टोबरला मुंबईत मनपासाठी बोलावलेली विशेष बैठक दोन वेळा रद्द झाली होती. आता हीच बैठक गुरुवारी (दि.3) होत आहे. विशेष म्हणजे पहिल्या बैठकीला आमंत्रित न करण्यात आलेल्या भाजपच्या तिन्ही आमदारांना भुसे यांनी रीतसर आमंत्रण दिल्याने भाजपची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण यासंदर्भात भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे या आधीच तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच ना. भुसेंनी भाजपला सोबत घेणे योग्य समजले असावे. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक शहरात ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये शिंदे गटाला ताकद मिळाली असली तरी शहरात मात्र अद्याप पाहिजे तेवढा गटाचा विस्तार होत नसल्याने ना. भुसे यांच्या हाती विस्ताराची सूत्रे देण्यात आली आहेत. 30 सप्टेंबरला ना. भुसेंनी मनपात बैठक घेत विविध योजनांचा आढावा घेतला होता. या बैठकीनंतर ना. भुसे यांनी अनेक आश्वासनेवजा घोषणा जाहीर केल्या. त्याबाबत 21 ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नाशिक दौर्‍यामुळे मुंबईतील आणि त्यानंतर नाशिकमधीलही बैठक ना. भुसे यांना रद्द करावी लागली.

भाजप आमदारांना निमंत्रण
नाशिक महापालिकेत भाजपने सत्ता उपभोगली असली तरी शिंदे गटाकडून भाजपला या आधी झालेल्या सर्वच बैठकांना बोलावले नाही की, सहभागही घेतला नाही. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे भाजप पदाधिकार्‍यांनी तक्रारी केल्यानंतर तसेच पालकमंत्री आपलेच असल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सांगितल्यानंतर समझोता झाला. यामुळेच गुरुवारी (दि.3) होणार्‍या बैठकीला आमदार प्रा. देवयानी फरांदे, अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्यासह सीमा हिरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या विषयांवर होणार चर्चा
354 कोटींची घंटागाडी योजना
सिंहस्थ कुंभमेळा आराखडा तयार करणे
सिडकोतील सदनिका फ्री होल्ड करणे
पंचवटी, सिडको विभागात स्वतंत्र रुग्णालये
गोदावरीची पूररेषा निश्चित करणे
मनपाचा आकृतिबंध मंजुरीकरता पाठपुरावा
निओ मेट्रो, स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचा आढावा
घरपट्टी वाढीव दरांमध्ये बदल करणे
उपनद्या, नैसर्गिक नाल्यांचे सुशोभीकरण करणे
शासन निधीतून 50 खाटांचे रुग्णालय
रस्ते काँक्रिटीकरणाचा आराखडा तयार करणे

हेही वाचा :

The post नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण appeared first on पुढारी.