नाशिक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ठरणार पुढील वर्षाचा आराखडा

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१२) जिल्हा वार्षिक योजनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सकाळी ११ ला होणाऱ्या बैठकीत सन २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजनेत ५०० कोटींच्या सर्वसाधरणसह अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनांचा आराखडा मान्यतेसाठी ठेवण्यात येईल.

तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा एकदा जिल्हा नियोजनची बैठक होत आहे. या बैठकीत पुढील वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेतील तिन्ही उपयोजनांचा आराखडा सादर केला जाणार आहे. त्यासोबत जिल्ह्याचा २०२२-२३ चा तिन्ही योजनांमधील खर्चाचा आढावा घेतला जाईल.

चालू वर्षी सर्वसाधारणचा आराखडा ६०० कोटींचा असून, अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजनांचा आराखडा अनुक्रमे १०० तसेच २४५.२२ कोटींचा आहे. त्यानुसार एकूण आराखडा १००८.१३ कोटींचा आहे. मात्र, माजी पालकमंत्री छगन भुजबळ आणि आ. सुहास कांदे यांच्यात जिल्हा नियोजन विभागाअंतर्गत निधी वितरणाच्या वादाचा मुद्दा राज्यभर गाजला. त्यातच जूनमध्ये राज्यात झालेल्या सत्ताबदलाचा फटकाही नियोजनच्या कामांना बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर १ एप्रिल २०२२ पासूनच्या कामांना स्थगिती दिली. त्यामुळे तब्बल ८ महिने नियोजन विभागांतर्गत तिन्ही उपयोजनांची कामे ठप्प झाली होती. पण, गत महिन्यात शासनाने तिन्ही उपयोजनांवरील बंदी उठविल्याने विकासकामांचा मार्ग मोकळा झाला. दरम्यानच्या काळात नियोजन विभागाकडून पुढील आर्थिक वर्षाचा तिन्ही उपयोजनांच्या आराखड्याला समितीची मान्यता घेण्यासाठी तयारी केली आहे. त्यानुसार ५०० कोटींच्या सर्वसाधारणसह अन्य दोन्ही उपयाेजनांचे आराखडे हे सोमवारच्या (दि.१२) बैठकीत मंजुरीसाठी ठेवले जातील.

६५ टक्के निधी खर्चाचे आव्हान

राज्यातील सत्तांतराचा परिणाम जिल्हा नियोजन समितीच्या २०२२-२३ च्या निधी खर्चावर झाला आहे. चालू वर्षी आतापर्यंत साधारणतः ३५ टक्के निधी खर्च झाला आहे. त्यामुळे मार्च एन्डपर्यंत म्हणजे येत्या चार महिन्यांत ६५ टक्के निधी खर्चाचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ठरणार पुढील वर्षाचा आराखडा appeared first on पुढारी.