Site icon

नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या

नाशिक : वैभव कातकाडे
एकीकडे 2023 पर्यंत सर्व घरांना पाणी पोहोचण्याच्या द़ृष्टीने उपाययोजना सुरू असतानाच दुसर्‍या बाजूला मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पाण्याचे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे अनेक शाळांना पाणी मिळाले असले तरीदेखील प्राप्त अहवालानुसार पालकमंत्र्यांच्याच मालेगाव तालुक्यात तब्बल 61 शाळांना अद्याप नळजोडणी नसल्याचे समोर आले आहे. तसेच जिल्ह्यातील 147 शाळा आणि 242 अंगणवाड्या पाण्यापासून वंचित आहेत.

पाणी हे जीवन समजले जात असताना विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याला मुकावे लागत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी पाणी ही मोहीम राबविण्यासाठी केंद्र शासनातर्फे निधी देण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभाग यासाठी निधी नियोजन करून प्रत्येक शाळेला, गाव, वाड्या-वस्ती याठिकाणी पाणी पोहोचेल या द़ृष्टीने प्रयत्न करत आहेत. 2019 पासून सुरू असलेल्या या योजनेत अद्याप अनेक गावांना पाणी मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. यासोबतच शाळेच्या विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचेदेखील समोर आले आहे. जिल्ह्यातील 4 हजार 566 शाळांपैकी 4 हजार 419 शाळांना पाणीपुरावठा होत असून, उर्वरित शाळांची कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात येत असले तरीदेखील विद्यार्थ्यांना हक्काच्या पाण्याला मुकावे लागत आहे. शाळांच्या बाबतीत बागलाण, देवळा, दिंडोरी, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर आणि येवला हे आठ तालुके स्वयंपूर्ण असले तरी इतर सात तालुक्यांतील शाळांना हा अभाव बघायला मिळत आहे. अंगणवाड्यांचा विचार करता अद्याप 242 अंगणवाड्या या पाण्याला मुकल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग, जलजीवन मिशन हे काम करत असले तरीदेखील ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समितीकडे प्रस्ताव यावा तिथून जिल्हा परिषदेकडे येणे आणि त्यानंतर निधी नियोजनात घेऊन त्यावर काम होत असते. या लांबलचक प्रक्रियेमुळेदेखील विद्यार्थ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

या तालुक्यातील विद्यार्थी वंचित…
शाळा : नांदगाव 42, मालेगाव 61, सुरगाणा 16, त्र्यंबक 13, इगतपुरी 6, कळवण 7, चांदवड 2. अंगणवाडी : नांदगाव 34, त्र्यंबक 44, बागलाण 57, मालेगाव 19, सुरगाणा 53, इगतपुरी 25, कळवण 3, नाशिक 3, चांदवड 3, पेठ 1.

हेही वाचा:

The post नाशिक : पालकमंत्र्यांच्याच तालुक्यातील शाळा तहानलेल्या appeared first on पुढारी.

Exit mobile version