नाशिक : पिवळ्या धमक फुलांनी सजले श्री राधा मदनगोपाल

इस्कॉन मंदिर नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वृंदावनमध्ये वसंत पंचमीपासून ४० दिवस होळीच्या उत्सवाला सुरुवात होते. याचे औचित्य साधून द्वारका परिसरातील इस्कॉनच्या श्री राधा मदनगोपाल मंदिरात विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली.

दरम्यान, वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमी. या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते. वातावरणात नवीन चैतन्य निर्माण होत असते. होळीची सुरुवातही या दिवसापासूनच होते, अशी आख्यायिका आहे. यानिमित्त भारतातील विविध राज्यांमध्ये वसंत पंचमी महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यादरम्यान भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत असतो. दरम्यान, नाशिक येथील इस्कॉन मंदिरातील सर्व सजावट पिवळ्या रंगांत करण्यात आली होती. सजावटीची तयारी गेल्या तीन दिवसांपासून सुरू होती. यात विविध प्रकारची पिवळी फुले आणण्यात आली. यामध्ये शेवंती, झेंडू, अस्टर, जरबेरा, जिप्सो, ऑर्किड, डच गुलाब अशा विविध फुलांचा व पानांचा उपयोग सजावटीसाठी करण्यात आला. श्री राधाकृष्ण यांचे वस्त्र फुलांनी बनविले होते. मंदिरातील महिला भक्तांनी हे वस्त्र आपल्या हाताने बनविले होते. यासाठी पूर्णशक्ती माताजी, प्रेम शिरोमणी माताजी, भक्ती माताजी व सत्यभामा कुमारी माताजी यांनी व मंदिरातील चेतना समूहाच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ ला मंगल आरतीने झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप आणि श्रीमद्भभागवतम प्रवचन झाले. सकाळी ९ ला श्री विग्रहांची विशेष शृंगार आरती करण्यात आली. दिवसभर नागरिकांची विशेष दर्शनासाठी मंदिरात गर्दी होती. संध्याकाळी सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सुंदर आणि मनमोहक अशा शृंगाराने सगळ्यांचे मन मोहित झाल्याचे बघायला मिळत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपालानंद प्रभू, रोचनकृष्ण प्रभू, सुकुमार गौर प्रभू, सरसकृष्ण प्रभू, राजा रणछोड प्रभू, सार्वभौमकृष्ण प्रभू आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post नाशिक : पिवळ्या धमक फुलांनी सजले श्री राधा मदनगोपाल appeared first on पुढारी.