नाशिक : पीकपंचनाम्यांचा आज अंतिम अहवाल येणार

अवकाळीचा फटका नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने झालेल्या पीक पंचनाम्यांचे अंतिम अहवाल शुक्रवारी (दि. २४) हाती येणार आहेत. या अहवालानुसार नुकसानभरपाईसाठी शासनाकडे आर्थिक मदत मागण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. दरम्यान, मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीच्या भरपाईसाठी पहिल्या टप्प्यात 2 कोटी ५८ लाखांची मागणी राज्यस्तरावर केल्याचे त्यांनी सांगितले.

चालू महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यावर अवकाळी पावसासह गारपिटीचे संकट दाटले आहे. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह द्राक्ष, कांदा, आंबा तसेच भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. जिल्ह्यात दि. ५ ते ८ मार्च या कालावधीत आलेल्या अवकाळीने ३२३ गावांमधील १,७४६ हेक्टरवरील पिकांचे मातेरे झाले आहे. त्यामुळे ३ हजार ९४६ शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका निफाड व नाशिक बसला असून त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील द्राक्षपीक धोक्यात आले आहे. प्रशासनाने पिकांचे पंचनामे पूर्ण करीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे २ कोटी ५८ लाख रुपयांची मागणी नोंदविली आहे.

जिल्ह्याला गेल्या आठवड्यातही अवकाळीने तडाखा दिला. त्यामुळे हजारो हेक्टरचे नुकसान झाले आहे. महसूल यंत्रणा कृषी विभागाच्या मदतीने पंचनामे करत आहे. शुक्रवारी (दि. २४) त्याचा अंतिम अहवाल हाती येईल. त्यानुसार नुकसानभरपाईच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

२२५ कोटी लवकरच खात्यात

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या काळात झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीने सुमारे १ लाख ७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका सव्वादोन लाख शेतकऱ्यांना बसला होता. प्रशासनाने भरपाईसाठी २२५ कोटींचे अनुदान राज्यस्तरावर मागितले आहे. शासनाने मार्चएण्डपूर्वी अनुदान थेट बँकखात्यावर जमा करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी तालुक्यांना याद्या अपलोड करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : पीकपंचनाम्यांचा आज अंतिम अहवाल येणार appeared first on पुढारी.