नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत

रेल्वे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात संदिग्धता कायम असल्याने जिल्ह्यात प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्पासाठी नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यात केवळ दोनच खरेदीखतांची प्रक्रिया राबविण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने नाशिक-नगर-पुणे या तीन जिल्ह्यांना जोडणार्‍या सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी सिन्नर व नाशिक तालुक्यांतील सर्व गावांचे भूसंपादनाचे दर घोषित केले. प्रशासनाने ऑक्टोबरअखेरपर्यंत साधारणत: 30 हेक्टर क्षेत्राचे अधिग्रहणही पूर्ण झाले. त्यामुळे प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांमध्ये होती. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा रेल्वेमार्ग रोड-कम-रेल्वे असा राबविण्याचे आदेश राज्याला दिल्यानंतर प्रकल्पातील अडथळे दूर होण्यापेक्षा वाढीस लागले आहेत. केंद्राच्या रोड-कम-रेल्वेमार्गाचा प्रकल्प कसा असणार, याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यातच राज्य सरकारमध्ये या प्रकल्पावरून दुहेरी मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमादरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या रोड-कम-रेल्वे प्रकल्पासाठी चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी प्रकल्पावरून महारेल, महसूल व अन्य संबंधित यंत्रणांमध्ये संदिग्धता आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणालाही काहीसा ब्रेक लागला आहे. शासन स्तरावरून प्रकल्पासाठी स्पष्ट दिशानिर्देश प्राप्त झाल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल, असे महसूल विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात तूर्तास पुणे रेल्वेचे काम साइड ट्रॅकला पडले आहे.

असा आहे प्रकल्प…
* रेल्वेसाठी जिल्ह्यात होणार 263 हेक्टरचे अधिग्रहण
* नाशिकमधील पाच गावे, सिन्नरच्या 18 गावांचा समावेश
* साधारणत: 30 हेक्टरचे भूसंपादन आतापर्यंत पूर्ण
* नाशिक-नगर-पुणे असा 232 किलोमीटरचा मार्ग
* जिल्ह्यात 51 किलोमीटरचा असणार असे रेल्वेमार्ग

हेही वाचा:

The post नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत appeared first on पुढारी.