नाशिक : पुरात वाहून जाताना दोघे बालंबाल बचावले, पाहा थरारक व्हिडीओ…

थरारक व्हि़डिओ सिन्नर,www.pudhari.news

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील कणकोरी-मानोरी रस्त्यावर जाम व लेंडी नदीच्या संगमावर पुरात वाहून जाताना दोघे दुचाकीस्वार बालंबाल बचावले. गुरुवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली.

पाण्याचा प्रवाह काहीसा कमी असल्याने काही तरुणांना पुराच्या पाण्यात उड्या घेऊन दोघांना वाचवणे शक्य झाले. पाण्याचा प्रवाह अधिक असता तर मात्र अनर्थ झाला असता. या घटनेत दुचाकी मात्र पाण्यात वाहून गेली. गोविंद भिकाजी अहिरे व संजय आंधळे अशी बचावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघे सकाळी कणकोरी-मानोरी रस्त्याने जात होते. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आलेला आहे.

काही वाहने पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या कडेला उभी होती. मात्र एका दुचाकीस्वाराने पुराच्या पाण्यातून दुचाकी घातली. तो सुखरुप पुढे गेला. त्याच्या पाठोपाठ अहिरे व आंधळे यांनीही दुचाकी टाकली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह दोघे पुलावरुन लोटले गेले. नदीपात्राच्या कडेला पूर पाहत उभे असलेल्या चंद्रकांत सांगळे व निलेश बर्डे यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उड्या फेकल्या व दोघांना वाचवले. त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला.

हेही वाचा :

The post नाशिक : पुरात वाहून जाताना दोघे बालंबाल बचावले, पाहा थरारक व्हिडीओ... appeared first on पुढारी.