नाशिक : पुलाच्या काठावर नियंत्रण सुटल्याने दोघे स्वार दुचाकीसह पूरपाण्यात

मालेगाव

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शहरातील श्रीरामनगर ते द्याने भागाला जोडणार्‍या फरशी पुलावर बुधवारी (दि.10) दुपारी विचित्र अपघात घडला. पुलाच्या काठावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघे स्वार दुचाकीसह मोसम नदीच्या पूरपाण्यात वाहून गेले. अग्निशमन दल आणि किल्ला तैराक ग्रुपच्या सदस्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत शोध अभियान राबवूनही त्या मुलांचा शोध लागला नाही. दुचाकी बाहेर काढण्यात यश येऊन तिच्या क्रमांकावरून त्या अज्ञातांची ओळख पटली आहे.

बुधवारी दुपारी दुचाकीवरील (एमएच 41 आर 5552) दोघे तरुण द्याने फरशी पुलावरून जात होते. नदीला सध्या पूरपाणी वाहत आहे. ते पाहत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते दोघे दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात पडले. काही नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ धाव घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मदतकार्य होऊ शकले नाही. अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. किल्ला तैराक ग्रुपच्या सदस्यांचीही मदत घेण्यात आली. वेगवेगळे पथक करण्यात येऊन द्याने पूल, सामान्य रुग्णालयाजवळचा पूल ते सांडव्या पुलापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली.

त्यात दुचाकी मिळून आली. तिच्या क्रमांकावरून ती पठाण नाजिम खान यांची असल्याचे कळाले. घटनाक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अबुरहमान नाजिम पठाण (16) व शहजाद जाकीर शेख (19) अशी नावे समोर आली. तेच बुडाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.

हेही वाचा :

The post नाशिक : पुलाच्या काठावर नियंत्रण सुटल्याने दोघे स्वार दुचाकीसह पूरपाण्यात appeared first on पुढारी.