नाशिक : पुस्तकवाचनभिशी उपक्रम – रामनवमी – हनुमान जयंतीनिमित्त…

वाचनभिशी www.pudhari.news
बायकांची वाचनभिशी या अनोख्या बायकांच्या भिशीमध्ये रामनवमी व  हनुमानजयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रामनवमी व हनुमानजयंती संबंधीत सर्व अध्यात्म यामध्ये वाचण्यात आले. प्रभु श्रीरामांना एक बहिण देखील होती. हे ऐतिहासिक रहस्य अद्यापपर्यंत भाविकांना माहिती नाही. याबाबत या वाचनभिशीमध्ये उलगडा करण्यात आला आहे. याबाबत एक स्टोरी……

पुस्तकवाचनभिशी उपक्रम – रामनवमी – हनुमान जयंतीनिमित्त…

प्रभु श्रीराम  –  आपल्या आयुष्यात जसे नातेवाईक आहेत. तसेच रामायणामध्ये सुध्दा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. जसे प्रभु श्रीराम महत्वाचे आहे. तसे भरत या पात्राचे देखील महत्व आहे. भरताचे दासत्व आहे. तर लक्ष्मणाचे सौदार्य आहे. 12 वर्ष वनवासात न झोपता पाठराखण केली. सिताच्या नसानसात रोमरोमात राम वास करतात. जेथे रावणाचे कपट तर तिथे बिभीषणाचे दासत्वभाग. हनुमानाची सख्य भक्ती सगुण भक्ती, निर्गुण भक्ती नाही. रामायणात प्रत्येकजण तात्विक प्रदेशात आहेत. आपआपल्या कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आहेत. रामायण महाकाव्य धर्मावर आहे. आपले वचन मोडायचे नाही हा धर्म आहे. एकच कथानायक सर्व नियमांना वळसा घालू शकणारा सूत्रधार तो म्हणजे कृष्ण आहे. सगळे नियम मोडीत काढूनही तो सर्व नियमांना धरुन असतो. राम असे आहेत की, नियम कितीही अप्रिय असला तरी त्याचे पालन करणे सक्तीचे आहे. असा हे मर्यादा पुरुषोत्तम आहे.  एकवाणी, एकवचनी आणि एकपत्नी असे श्रीराम आहेत. किती सख्खा असला तरी त्यासोबत अन्यायाने लढायचे आहे. 

सीता –  जनक राजाची मुलगी सीतादेवी. प्रभु श्रीरामाची पत्नी. तिची इतर नावे म्हणजे वैदेही, मैथिली, जानकी, भूमिजा व ऋता असे नाव आहेत. परंतु साक्षात विष्णूच्या पत्नीचा अवतार लक्ष्मीचा अवतार म्हणजे सीता होय. मिथीलेचा राजा जनक म्हणून तिचे नाव मैथीली होते. जनक राजाची मुलगी भूमीतून जमिन नांगरत असतांना नांगराच्या फळाला लाकटी पेटी लागली असताना ती निघाली. ती बालिका म्हणजे भूमिजा होय. सीता शांततेचे व सहनशीलतेचे प्रतीक आहे. विष्णूची पत्नी लक्ष्मी त्रेतायुगात तपस्या करताना रावणाने तिचा तपोभंग केला. त्यावेळी तिने स्वत:चे अग्नीदहन करुन घेतले आणि तुझ्या मृत्यूला मी कारणीभूत असेन असा शाप दिला. त्यामुळे रावणाला भय वाटले. तेव्हा रावणाने त्यावेळी आदेश दिला की हिला जमिनीत पूरवून टाका. असा आदेश देताच शिपायाने लाकडी पेटीत ठेवून जमिनीत त्या बालिकेला गाडून टाकले. रामायणातील संदर्भ आणि स्कंदपुराणात असे सांगितले आहे की, रावणाने सीतचे हरण केले तेव्हा खरी सीता न जाता तिची सावली म्हणजे माया हरण झाली. तोपर्यंत सीता अग्नीच्या आश्रयाला गेली. रावणाच्या युध्दातून सीतेला परत मिळवल्यावर अग्नीतून खरी सीता मिळाली.
हनुमान – अंजनी आणि केसरी यांचा पुत्र म्हणजे हनुमान. वायूची त्याच्यावर कृपा होती.  जेव्हा रामाने हनुमानाला विचारलं की, तू माझ्यासाठी एवढे मोठं काम केलं. तर मी तुझ्यासाठी काय देऊ. हनुमानाने सांगितलं की प्रभु मला काहीही नको. तेव्हा रामाने हनुमानाला फक्त अलिंगन दिलं. रामाकडून हनुमानाला काहीही अपेक्षित नव्हतं. प्रभु श्रीरामाने फक्त आपल्या हृद्यात राहावे एवढेच त्याला अपेक्षित होते. माता सीतेचे सुध्दा हनुमानावर खूप प्रेम होते. तिची सुटका हनुमानामुळे झाली. म्हणून राज्यभिषेकावेळी तिने हनुमानाला विचारले मी तुला काय देऊ. तेव्हा देखील त्याने काहीच सांगितले नाही. म्हणून सीतने तिची माळ त्याला दिली. त्यानंतर हनुमानाने ती माळ घेऊन एक एक मणी फोडू लागला. तेव्हा सीतने विचारलं की हे तू काय करत आहे. तेव्हा महनुामनाने सांगितलं. की, ज्या माळेतील मणीमध्ये माझा राम नाही ती माळ काय कामाची.
अंगद –  श्रीरामाचा शांतीदूत म्हणून अंगदची निवड होते. तेव्हा तो लंकेस गेला असता अंगदने रावणाला त्याच्याच दरबारात शिकवणी दिली. ज्यावेळी रावणाने अंगदला अपमानित केले. त्यावेळी अंगदने रावणाला फटकारले. त्यामुळे रावणाने अंगदला पकडण्यास सांगितले. त्यावेळी अंगदने सांगितले की, मी माझ्या आयुष्याची एक कृती करत आहे. माझ्या चारित्र्यात चमक असल्यास हे माझे पाय कोणीही जागेवरुन हलवले तर मी स्वत: त्याग करुन श्रीरामांना पुन्हा अयोध्येत घेऊन जाईन. त्याने संपूर्ण शरीराला बलिष्ट करत पाय जमिनीत राेवले. रावणाच्या सभेत असा एकही नव्हता. जो अंगदच्या पायाला हलवू शकेन. सगळे सामर्थ्यवान प्रयत्न करुन थकले. मात्र कोणासही यश हाती आले नाही. जेव्हा संतापून स्वत: लंकेशच अंगदचा पाय हवलवण्यास उठले आणि लंकेशने अंगदच्या पायाला हात लावला. तेव्हा अंगद म्हणला, हे लंकेश आपण माझ्या पायाला हात लावणे चांगले नाही. त्यापेक्षा तुम्ही श्रीरामाच्या आश्रयाला जावे. हे ऐकून लंकेश शांत झाला. लंकेशने शांतीदूताचे ऐकले नाही. शेवटी रामाने रावणावर विजय मिळवला.
उर्मिला – लक्ष्मणाची पत्नी म्हणजे उर्मिला होय. पती आणि त्याच्या कुटुंबाची सेवा हाच स्त्रीधर्म हे मानून तिने ठरवले की, श्रीराम, सीता, लक्ष्मण हे चौदा वर्षे वनवासात जात आहेत. तेव्हा आपणही सोबत जायचे. परंतु सगळेच गेले तर लक्ष्मणाच्या आप्तेष्ठांची काळजी कोण घेणार त्यामुळे ती निश्चय करते की, आपण नाही जायचे. त्यानंतर उर्मिलाच्या मनाप्रमाणे ती लक्ष्मणाच्या नातेवाईकांची काळजी घेते आणि लक्ष्मण रामासोबत वनवासात जातो.
राजा दशरथ – राजा दशरथावर आकाश कोसळले...
श्रीरामाच्या यौवराज्यभिषेकाशी संबंधित अशी सर्व कामे योग्य माणसांवर सोपवून व ती सर्व कामे मार्गाला लागल्याचे पाहून , राजा दशरथाची स्वारी कैकयीच्या वाड्याकडे मोठ्या खुशीत वळली. परंतु तिच्या महालात तो केस मोकळे साेडलेली, फाटकी वस्त्रे ल्यालेली आणि अंगावरची दागिने इतस्तत: फेकून जमिनीवर पडून राहिलेली कैकेयी त्याच्या दृष्टीस पडली. तो तिच्याजवळ जावून प्रेमळ शब्दात म्हणाले, ‘लाडके उद्या आपल्या श्रीरामाला व्हावयाच्या यौवराज्यभिषेकानिमित्त सर्वत्र आनंदीआनंद असताना तू अशी दु:खी का? तुला काही हवं असल्यास ते मोकळेपणाने माझ्याकडे माग. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळेस मी माझे प्राणही पणाला लावीन.’ यावर कैकेयीने विचारलं. ‘मी मागेन ते दोन वर पूर्ण करावयाचे आहे.  मला तुमच्या लाडक्या रामाची शपथ घेवून तुम्ही वचन देता का? राजा दशरथ म्हणाले – ‘कैकेयी, रघुकुलाची थोर परंपरा तुला ठाऊक नाही वचनपूर्तीसाठी आम्ही वेळेस प्राण देऊ. पण वचनभंग करणार नाही. अशा स्थितीत आणखी श्रीरामाची शपथ घेण्याची काय गरज आहे. तरीही त्याची शपथ घेऊन तुला वचन देतो की, तू मागशील त्या दोन वरांची मी पूर्तता करीन.’ कैकेयी बालू लागली. ‘नाथ, मी काही कोणते नवे वर मागत नाही. शवर व इंद्र यांच्या सुरु झालेल्या युध्दात इंद्राला मदत करण्यासाठी तुम्ही गेला होता. त्यावेळी मीही तुमच्यासंगे आले होते. तेव्हा तुम्ही दैत्यांच्या बाणांनी मूर्च्छा येऊन पडला असताना तो रथ दैत्यांच्या कोंडाळ्यातून कौशल्याने बाहेर काढून तुमच्या शरीरात घुसलेले बाण हळुवारपणे काढून व तुम्हाला औषधोपचार करून मी तुमचे प्राण वाचवले. म्हणून तुम्ही जे दोन वर देऊ केले होते ते मी आता तुमच्याकडे मागत आहे.’ राजा म्हणाले, ‘माग, ना मी ते पूर्ण करायला तयार असाताना तू असा वेळ का लावतेस?’ राजा शब्दात पक्का अडकल्याचे पाहून कैकेयी म्हणाली, ‘एका वरानुसार श्रीरामाऐवजी माझ्या भरताला यौराज्यभिषेक करा आणि दुसस-या वराप्रमाणे श्रीरामाला तापसी वेषात उद्याच्या उद्या चौदा वर्षासाठी दंडकारण्यासारख्या दुरच्या वनात पाठवा.’ कैकयीच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या दोन मागण्या ऐकून राजा दशरथावर जणू आकाश कोसळले. मूर्च्छा येऊन ते भूमीवर कोसळला. थोड्या वेळाने शुध्दीवर आल्यावर तो काकुळतीने तिला म्हणाले. ‘कैकेयी अग, एक वेळ अन्नपाण्यावाचूनही मी दिवसानुदिवस तग धरीन पण माझ्या रामाशिवाय मी घटका दोन घटकाही काढू शकणार नाही. वाटल्यास मी रामाऐवजी भरताला यौवराज्यभिषेक करतो. पण माझ्या रामाला चौदा वर्षाच्या वनवासाला पाठवण्याचा हट्ट तू धरु नकाे. पण यावर कैकेयी एकच उत्तर देई. ‘शब्द पाळणा-या रघुकुलाची थोर परंपरा सांगणारे तुम्ही आता दिलेले वचन मोडू पाहता. खुशाल मोडा पण हे लक्षात ठेवा की, जर का तुम्ही उद्या रामाला यौवराज्यभिषेक करु लागलात तर तिथे येवून तुम्ही वचन मोडल्याचा मी डांगोरा पिटीन आणि आत्महत्या करून घेईन.’ कैकेयीची ती धमकी ऐकून राजा तिला म्हणाले, ‘आजपासून माझ्या तुझ्यातले पतीपत्नीचे संबंध संपले आहेत.’ राजा जेमतेम एवढेच बोलले व पुन्हा मुर्च्छीत होवून खाली पडले.
कैकयी – ही रामायणातील उल्लेखानुसार अयोध्येचा राजा दशरथ यांच्या तीन पत्नींपैकी अयोध्येची राणी होती. ती कैकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. तिला दशरथापासून भरत नावाचा पूत्र झाला. भरतास आयोध्येचे राज्य मिळावे. या हेतूने तिने आपला सावत्र मुलगा राम यास वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. कैकयीस पूर्वी दिलेल्या वराच्या पूर्ततेसाठी दशरथाला कैकयीची मागणी मान्य करावी लागली. परंतु पुत्रविरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे वाल्मिकीकृत रामायणात व आधारलेल्या उत्तरकालीन साहित्यात कैकयीचे स्वभावचित्रण खलनायकी छटेत केले गेले आहे.
रावण व त्याची लंका – जगातील कोणी पुण्यवान असेल तर तो रावण आहे. – रामाच्या हातून रावणाचा वध झाला. रावणाला दोन पत्नी होत्या. मंदोदरी पासून मेघनाथ, अक्षयकुमार आणि आदित्य असे तीन मुले होते. दुसरी पत्नी दममालिनी पासून चार मुले झाली. तसेच कुंभकर्ण, बिभीषण व शुर्पनखा ही रावणाची भावंडे होती. रावणाचा दशअवतार म्हणजे दहातोंडे होती. ही दहा तोंडे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, इर्षा, मान, अपमान, चित्तक, अहंकार अशी होती. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी रावणाने खूप वर्षे कठोर तपस्या केली. परंतु ते प्रसन्न झाले नाही. त्यानंतर रावणाने एक शिर, एक शिर अर्पण करण्याचा निर्णय घेतला. तो शंकराच्या भक्तीत लीन होते. त्याने प्रत्येक शीर अर्पण केले. असे करता करता त्याने रावणाने नऊ शीर शंकराला अर्पण केले. त्यानंतर दहावे शीर अर्पण करत असताना तेव्हा शंकर तिथे प्रकट झाले. रावणाची भक्ती पाहून ते प्रसन्न झाले. त्यामुळे रावणाला शंकराचे परमभक्त म्हणून समजले जाते. रावण हो थोर स्थापत्य व शास्त्रज्ञ होता. त्याने लंकेची सोपी व सुलभ अशी रचना केली. त्याला सोन्याची लंका म्हणून संबोधले जाते.
रामायणातील संस्मरणीय व्यक्तिरेखा- खारुताई
रामायणातील प्रत्येक व्यक्तीरेखा आदर्श वाटतात. यात अनेक मानवी गुणांचे अनेकोत्तम दाखले आहेत. यात भ्रातृप्रेम, त्याग, सेवाभाव, वात्सल्य, हनुमंताची स्वामीननष्ठा, असे अनेक वैशिष्टये आढळतात. वाल्मिकी रामायण किती पुरातन असले तरी ते आजच्या परीस्थितीतही लागू पडते.
रामायणातील खारीचा वाटा – सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंतआणि सर्व वानरसेना निघाली होती. ते भारताच्या दक्षिण टोकाला पाेहाेचले. लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते.  हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतु (पूल) बांधायचे ठरवले. सर्व वानरसेना मोठे मोठे दगड आणून त्यावर श्रीराम असे प्रभुचे नाव लिहून समुद्रात टाकत होते. ते प्रभुनामाच्या महिमेमुळे ते दगड समुद्रात तरंगत होते. हळूहळू सेतू आकार घेत होता. यावेळी एका छोट्या खारीला पण वाटले की आपणही सेतू बांधायला मदत करावी. मदत काय करणार म्हणून ती समुद्राच्या बाजूला असलेल्या वाळूत जाऊन लोळायची व आपल्या शरीरावरील केसात बारीक वाळू आणून ती सेतूवर टाकायची. इतर वानरांना जेव्हा खारुताईची मदत पाहिली तेव्हा ते हसायला लागले. ते तिला म्हणाले “अगं खारुताई, लंकेत जायला मोठा सेतू बांधायचा आहे. आम्ही बघ किती मोठे दगड उचलून आणतो आहे. तुझ्या अंगाला चिटकलेल्या वाळूमुळे सेतू बांधण्यास काय मदत होणार? तु उगाच धडपड करू नकोस.” खार हिरमुसली. प्रभु श्रीरामांनी हा संवाद ऐकला. त्यांनी खारीला उचलुन हातावर घेतले. आणि इतर वानरांना म्हणाले. “चांगल्या कामात फक्त मोठे काम करणे महत्वाचे नसते. चांगल्या भावनेने आपल्याला जे योगदान शक्य असेल ते करणं महत्वाचं असतं. आपल्याकडे जास्त क्षमता असेल म्हणुन दुस-यांच्या छोट्या सत्कार्याला करण्यापासून रोखू नये. लहान, मोठे, कमजोर आणि शक्तीवान अशा सगळ्यांनी आपल्या परीने योगदान दिले तरच मोठं कार्य पूर्ण होणार आहे. शावेळेस आपले कार्य आणि दुस-याच कार्य याची तुलना करू नये. तसे करुन आपण व आपल्या कार्याची किमत कमी होते. वानरांनी क्षमा मागितली आणि त्यांनी खारूताईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले. प्रभु श्रीरामाची ही निशाणी प्रत्येक खारुताईच्या शरीरावर दिसून येते.
गोष्टीतले तत्त्वज्ञान सारांश असे सांगते की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. ते काम करणा-या व्यक्तीची भावना महत्वाची असते. म्हणून कोणालाही कामावरुन हिणवू नये. आपण कोणत्याही चांगल्या कार्यात विघ्न न आणता खारीचा वाटा देता आता तर नक्कीच द्यावा. 
 
प्रभु श्रीराम यांची एकुलती एक बहिण शांता –
रामचरित ग्रंथात शांतेचा उल्लेख आढळत नाही.प्रभु श्रीरामांची एकुलती एक बहीण कायमच रामायणाच्या कथेपासून आणि भक्तांच्या श्रद्धेपासून दूर राहिली. असं का घडलं? कोण होती ही बहीण? रामाच्या या बहिणीची नेमकी कथा काय? हे जाणून घेवूया….
प्रभु रामचंद्रांना बहीण आहे हेच अनेकांना ठाऊक नाही त्यामुळे जितक्या सहजेने रामायणातील इतर पात्र आपल्याला आठवतात तितक्याच ताकदीने शांता हे नाव मात्र आपल्याला आठवत नाही.
कोण होती देवी शांता? तुम्हाला वाटत असेल की रघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांचा जन्म झाला मात्र त्यापुर्वीही दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता. रघुवंश कुळातील ही सर्वात ज्येष्ठ कन्या होती. शांतेचा जन्म झाला आणि राणी कौसल्येच्या मांडीवर ती खेळू लागली. मात्र त्यानंतर पुढील तब्बल १२ वर्ष दशरथ राजाला मुलगा होत नव्हता. शांता लहान असतानाच दशरथ राजाकडे कौसल्या राणीची बहिण वर्षीणी आणि तिचे पतीदेव राजा रोमपद आले होते. दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांनी त्यांचे आगतस्वागत केले. मात्र चर्चादरम्यान राणी वर्षीणी दुःखी असल्याचे कौसल्या राणीला कळले.विवाहानंतर अनेक वर्ष उलटली तरीही अपत्यप्राप्ती नसल्याने हे दाम्पत्य दुःखी असल्याचे कळताच राजा दशरथाने उदार मताने आपली लाडकी लेक शांता या दाम्पत्याला दत्तक म्हणून देण्याचे जाहीर केले. अर्थात शांता ही मावशीच्याच घरी राहणार असल्याने तिचे उत्तम प्रकारे संगोपन होईल याची कौसल्या राणीला खात्री होती. शिवाय या निर्णयाने आपली बहीण आनंदी राहील या विचारांनी राणी कौसल्येने राजाच्या निर्णयाला होकार दिला आणि तेव्हापासून लहानगी शांता रोमपद राजाच्या राजवाड्यात आनंदाने नांदू लागली. अंगद देशाच्या राजा रोमपद यांच्या राजवाड्यात लाडाने वाढणाऱ्या शांतेला वेदशास्त्र, धनुर्विद्या, कला अशा वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानही अवगत असल्याचे आख्यायिका सांगतात.
म्हणून रामायणात फारसा उल्लेख नाही… रामायणाची कथा सुरु होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून! शांताच्या जन्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बाललिला दिसू लागतील या विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकीला बहिणीला दत्तक दिले, मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. अशातच राणी कैकयी आणि सुमित्रा यांच्याही पदरी मुलबाळ नव्हते.राजा दशरथ यांनी श्रृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा जन्म झाला.
रोमपद राजा मुलगी शांतेशी खेळण्यात, तिच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त असताना एका याचकाने आपल्या शेतीसाठी राजाकडे याचना केली. मात्र राजाने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. राजाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने याचक चांगलाच संतापला. हा याचक इंद्र देवाचा भक्त होता. इंद्रदेवाला आपल्या याचकाच्या अपमानामुळे राग आला, त्यामुळे रोमपद राजाला अद्दल घडवण्यासाठी इंद्रदेवाने शाप दिला. यामुळे पुढील वर्षी रोमपद राजाच्या राज्यात पाऊस पडला नाही, दुष्काळामुळे राज्यातील जनता आणि पर्यायाने राजाही हैराण झाला. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी राज्याने श्रृंग ऋषींना पाचारण केले. ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्याच नेतृत्वाखाली हा यज्ञ भक्तीभावाने केला गेला आणि त्यानंतर दुष्काळाचे संकट टळले. राज्यात सारं काही अलबेल झाल्याचे पाहून रोमपद राजाने खूश होत आपली कन्या शांता हिचा विवाह ऋषींशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शांता देवी आणि ऋषी श्रृंग हे कुल्लू येथे राहू लागले अशी कथा आहे. कुल्लू येथून ५० किलोमीटर अंतरावर देवी शांता यांचे मंदिर आहे. या मंदिरात शांता देवीसह त्यांचे पती ऋषी श्रृंग यांचीही पुजा केली जाते. आजही देशातून अनेक भाविक या मंदिरात नित्यनियमाने पुजा करतात. याप्रमाणे शांता देवी ही रामाची बहीण होती, हेच भरपूर लोकांना माहितीच नाही.

The post नाशिक : पुस्तकवाचनभिशी उपक्रम - रामनवमी - हनुमान जयंतीनिमित्त... appeared first on पुढारी.