नाशिक : पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याविना जलजीवन रखडल्याची चिन्हे

जलजीवन मिशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हर घर पाणी या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेला पूर्णवेळ कार्यकारी अभियंताच मिळत नाही. त्यामुळे काही गावांमध्ये अद्यापही जलजीवनची कामे रखडलेलीच आहेत. डिसेंबर २०२२ अखेर जिल्ह्यातील १२२२ कामांना मंजुरी दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर यांनी बदली करून घेतली. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वाली कोण, असा प्रश्न ठेकेदार, ग्रामस्थ यांना पडला आहे.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून, जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेत प्रशासनाची धावपळ सुरू आहे. मार्चअखेर जिल्ह्यातील 125 कामे सुरू झालेली नव्हती. गेल्या 15 दिवसांत यातील केवळ 59 जलजीवन योजनांच्या कामांना सुरुवात झाली आहे. अद्यापही 66 योजनांना प्रारंभ झालेला नाही. प्रामुख्याने पाण्याचे स्त्रोत उपलब्ध न होणे, वन, जलसंपदा विभागाच्या परवानही न मिळणे, गावांतर्गत वाद यामुळे या योजना सुरू झालेल्या नाहीत.

जिल्ह्यातील 1296 गावांसाठी 1222 जलजीवन योजना मंजूर झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या 1222 योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहे. यात 681 योजना रेट्रोफिटिंग तर, 541 योजना नवीन आहेत. यासाठी 217.62 कोटींचा निधी मंजूर आहे. कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर योजनेचे काम सुरू होणे अपेक्षित असताना वेळेत सुरू होऊ शकलेल्या नाहीत. मार्चअखेर झालेल्या आढावा बैठकीत 125 कामांना प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसल्याचे समोर आले होते. अनेक गावांच्या पाण्याच्या गरजेप्रमाणे योजनेचा आराखडा नसल्यामुळे ग्रामपंचायतींनी तक्रारी आल्या होत्या.

पाण्याचे स्त्रोत योग्य नसल्याने अडचण

प्रशासनाने योजना सुरू करण्यासाठी पुन्हा ठेकेदारांकडे तगादा लावला. या तगाद्यानंतर केवळ 59 योजनांचे काम सुरू झाले आहे. अद्यापही 66 योजनांचे कामांना प्रारंभ झालेला नाही. यात प्रामुख्याने चांदवड तालुक्यातील 10 योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी निश्चित करण्यात आलेले पाण्याचे स्त्रोत योग्य नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. कळवण तालुक्यातील योजनांबाबत गावअंतर्गत वाद असल्याने योजना सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

परवानगी नसल्याने योजना रखडल्या

पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात वनखात्याची परवानगी नसल्याने योजना रखडल्या आहेत. मंजूर 1222 योजनांपैकी 1 हजार 99 कामे प्रगतीत आहेत. तर, 57 योजना फक्त पूर्ण झालेल्या आहेत. या योजना पूर्ण करण्याची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन व ठेकेदार यांच्यासमोर योजना पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे.

The post नाशिक : पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याविना जलजीवन रखडल्याची चिन्हे appeared first on पुढारी.