नाशिक पूर्व वनविभागाचे कामकाज ठप्प; विकासकामांना लागला ब्रेक

वनविभाग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दीड महिन्यापासून नाशिक पूर्व वनविभागाची धुरा प्रभारी अधिकार्‍यांच्या हाती आहे. मात्र, संबंधित अधिकारी त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी कामात व्यग्र असल्याने पूर्व वनविभागाचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. स्वाक्षरीअभावी नियमित फायलीही निकाली निघत नसल्याने इतर अधिकारी – कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत.

नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे हे दोन महिन्यांच्या प्रशासकीय कामकाजाच्या प्रशिक्षणासाठी डेहराडून येथे गेले आहेत. त्यांच्या जागी नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. गर्ग यांना दोन्ही विभागांचे दैनंदिन कामकाज पाहताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पश्चिम वनविभागाच्या हद्दीत दररोज काही ना काही घटना घडत असल्याने गर्ग हे अपेक्षित वेळ देण्यात कमी पडत असल्याची ओरड अधिकारी – कर्मचार्‍यांमध्ये आहे. नियमित उपवनसंरक्षक नसल्याने पूर्व वनविभागातील अनेक महत्त्वांच्या कामांच्या मंजुरी रखडल्या आहेत. अनेक प्रस्ताव मंजुरीवाचून प्रलंबित आहेत. विकासकामांसह प्रशासकीय कामकाज हे थांबले आहे. प्रभारी अधिकारी हे अनेक महत्त्वांच्या फायलींवर निर्णय घेत नसल्याने ही कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्रभारींनी नियमित कामकाजाला प्राधान्य दिल्याने इतर कामांना ब्रेक लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, उपवनसंरक्षक वावरे हे 22 सप्टेंबरला प्रशिक्षण संपल्यानंतर सेवेत रुजू होणार असून, तोपर्यंत दैनंदिन कामकाज संथ गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे. वावरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच पूर्व वनविभागाच्या दैनंदिन कामकाजाला गती मिळणार असल्याची चर्चा आहे.

प्रभारींना मिळेना वेळ
नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे हे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांचा अतिरिक्त कार्यभार नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, गर्ग यांच्याकडे कामाची व्याप्ती जास्त असून, कारवाईचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांना पूर्व वनविभागाचे कामकाज पाहण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक पूर्व वनविभागाचे कामकाज ठप्प; विकासकामांना लागला ब्रेक appeared first on पुढारी.