नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट

वृद्धाची 20 किमी पायपीट,www.pudhari.news

तुकाराम रोकडे | पुढारी वृत्तसेवा

नाशिक ( देवगांव) : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना शेंद्रीपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) ते हरसूल असा वीस किलोमीटरचा प्रवास पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबा दहाड यांना करावा लागला. तेही आळूचे गाठोडे डोईवर घेऊन. घाटातील दाट जंगलातून पंच्याहत्तरी पार केलेले काळूबाबा काठीचा आधार घेत निघाले होते.

काळूबाबांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झालाय. उतरत्या वयात पत्नी, स्नुषा आणि नातवाला सांभाळण्याची वेळ बाबांवर आली आहे. शेती आहे पण ती करणार कोण? असा प्रश्न बाबांचा आहे. जंगलात फिरून त्यांनी आळू जमा केला. कापडी फडक्यात तो बांधला आणि बाबा निघाले थेट हरसूलच्या दिशेने. घरच्यांनी फडक्यात भाकरी बांधून दिली होती. पायी प्रवासात बाबांच्या पायात चप्पल नव्हती.

बाबा म्हणाले, की जंगलातून रानभाज्या, आळू जमा करून मी हरसूलमध्ये विकायला पायी जातो. पन्नास ते शंभर रुपये मिळतात. वाहनाने प्रवास केल्यास चाळीस रुपये भाडे लागते. म्हणून मी पायी प्रवास करतो. अडीच तास प्रवास केल्यावर हरसूलमध्ये पोचतो. भाजी विकल्यावर बाजार घेऊन परत पायी घराकडे निघतो.

हेही वाचा :

The post नाशिक : पोटाची खळगी भरण्यासाठी दाट जंगलातून काळूबाबांची वीस किमी पायपीट appeared first on पुढारी.