नाशिक : पोत ओरबाडणाऱ्या दोघांना सश्रम कारावास

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वृद्धेच्या गळ्यातील पोत ओरबाडून पळणाऱ्या दोघांना न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. योगेश दामू कडाळे (२०, रा. तानाजी चौक, सिडको), विशाल परसराम आवारे (१९, रा. बडदेचाळ, सिडको) अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

मंगला रमाकांत शिरोडे (६५, रा. ता. साक्री, जि. धुळे) या ८ मे २०१७ रोजी पाथर्डी फाटा परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या योगेश व विशालने मंगला यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाची ५४ हजार रुपयांची पोत ओरबाडून पळ काढला. या प्रकरणी दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. व्ही. गिरमे यांनी तपास करून दोघांना पकडले व न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. एम. वाघचौरे व एस. एस. चिताळकर यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायाधीश जी. एम. कोल्हापुरे यांनी दोघांनाही परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे जबरी चोरी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार आर. के. पाटील यांनी पाठपुरावा केला.

हेही वाचा :

The post नाशिक : पोत ओरबाडणाऱ्या दोघांना सश्रम कारावास appeared first on पुढारी.