नाशिक : पोलिसांना माझा सॅल्यूट आहे !

पोलीस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कारने धडक दिल्यानंतर १५ ते २० मिनिटे जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून असलेल्या महिलेस शहर पोलिसांनी उचलून पोलिस वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे महिलेची प्रकृती धोक्याबाहेर गेली. पोलिसांच्या वर्तवणुकीबद्दल ११२ क्रमांकाच्या प्रतिनिधीने फीडबॅक घेतला. मदत मागणाऱ्या व्यक्तीने पोलिसांच्या सेवेबद्दल ‘पोलिसांना माझा सॅल्यूट आहे’ असे सांगून समाधान व्यक्त केले.

सीटी केअर रुग्णालयासमाेरील मार्गावरून शनिवारी (दि. ७) सकाळी सव्वासहाच्या सुमारास पायी जात असताना एका महिलेला अज्ञात कारने धडक दिली. त्यात गंभीर मार लागल्याने त्या रस्त्यात पडून होत्या. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून त्यांना मदत मिळाली नाही. दुचाकीवरून जाणाऱ्या अल्ताफ शेख यांना ही घटना दिसताच त्यांनी वाहन थांबवून जखमी महिलेची चौकशी केली, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना मदतीसाठी विनंती केली. मात्र, कोणीही थांबत नसल्याने त्यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका मागवली. १०८ क्रमांकावरील व्यक्तीने अपघाताचे ठिकाण, मदत मागणाऱ्याची माहिती, अपघात आदी चौकशी करीत रुग्णवाहिका पाठवतो, असे कळवले. मात्र १५ ते २० मिनिटे उलटूनही रुग्णवाहिका येत नसल्याने अल्ताफ यांनी तोपर्यंत वाटसरूंकडे मदत मागितली. परंतु मदत काही मिळाली नाही. अखेर त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी तातडीने गस्तीवरील पोलिसांना अपघाताची माहिती देत मदत करण्याच्या सूचना केल्या. घटनास्थळापासून जवळ असल्याने सुरुवातीस मुंबईनाका पोलिसांचे पथक पोहोचले, तर काही क्षणांत भद्रकाली पोलिसांचेही पथक पोहोचले. मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकातील कर्मचारी महाजन यांच्यासह भद्रकाली पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई रवि जाधव व फरीद इनामदार यांनी जखमी महिलेस तातडीने पोलिसांच्या वाहनात टाकून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी महिलेची ओळख पटलेली नव्हती. यानंतर ११२ क्रमांकावर मदत मागितल्यानंतर पोलिसांच्या मदतकार्याचा अनुभव कसा आला, याबाबत पोलिसांनी अल्ताफ यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पोलिस तुमच्यासोबत व्यवस्थित बोलले का, असा प्रश्न विचारल्यानंतर अल्ताफ यांनी पोलिसांच्या मदतकार्याबद्दल ‘पोलिसांना माझा सॅल्युट आहे’ असे बोलून समाधान व्यक्त केले. या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुकही होत आहे. अल्ताफ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिला आरती परदेशी यांची विचारपूस करीत माणुसकीचे दर्शन घडवले.

अल्ताफ यांचे पोलिसांबद्दलचे मत

जखमी महिलेस रुग्णालयात नेण्यासाठी सुरुवातीस १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, १५ ते २० मिनिटे उलटूनही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे ११२ क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली. अवघ्या दहा मिनिटांत मुंबईनाका व भद्रकाली पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी स्वत: जखमी महिलेस उचलून पोलिस वाहनात टाकून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांचे काम खूप मस्त आहे. पोलिसांना लोक नेहमी वाईट बोलतात. मात्र, पोलिस किती मदत करतात ही पोलिसांची चांगली बाजूही नागरिकांना माहिती झाली पाहिजे. पोलिस वेळेवर आले म्हणून महिलेचा जीव वाचला. थाेडा उशीर झाला असता तर महिलेच्या प्रकृतीला धाेका आला असता. पोलिसांना माझा सॅल्युट आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिसांना माझा सॅल्यूट आहे ! appeared first on पुढारी.