नाशिक : पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केले उपोषण

cidco www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 10 ऑक्टोबरला पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याने स्थगित करत चुंचाळेतील कारगिल चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे व रामदास दातीर यांनी दिली.

अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर, घरकुल परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यासाठी नाशिक-मुंबई मोर्चा शनिवारी (दि. 8) प्रस्थान करणार होता. पोलिस आयुक्तांनी साहेबराव दातीर व ग्रामस्थांसह बैठक घेतली. पोलिस आयुक्त कार्यालयाकडून नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगताना येत्या 10 ऑक्टोबरला पालकमंत्री भुसे यांच्यासमवेत बैठक होणार अशी माहिती दिली. शनिवारी सकाळी कारगिल चौकातील सभेत साहेबराव दातीर यांनी बैठकीची माहिती देत तूर्त साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. उपोषणात दातीर, दोंदे यांच्यासह ज्योती कवर, विष्णू फडोळ, उत्तम मटाले, नवनाथ शिदे, संपत पिंगळे आदींसह नागरिक सहभागी झाले.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केले उपोषण appeared first on पुढारी.